ह्या आणि इतर बऱ्याचशा गोष्टींची सुरूवात आपण आपल्यापासूनच केली पाहीजे. मी बाहेर गेल्यावर कधीच कचरा कुंडीशिवाय इतरत्र टाकत नाही. अगदी चॉकलेट आवरण सुद्धा हातात नाहीतर पर्समध्ये ठेवते. ट्रेन मध्ये संत्रे खाल्ल्यावर साले पर्समध्ये टाकते. आणि आजूबाजूला बऱ्याच लोकांना पण असे करताना पाहिले आहे.
माझ्या मुलीला ह्या गोष्टींची इतकी सवय झालीय की ती दुकानात आइसक्रिम वगेरे घेतल्यावर आधी केराचे टोपले शोधते आणि मगच आइसक्रिमचे कव्हर काढते. माझ्याबरोबर माझा एक लांबचा भाउ राहतो. तो गावाहून आला आहे. पण त्यालाही माझ्यामुळे कचरा टोपलीतच टाकायची इतकी सवय झालीय की कधी कधी चटकन कचराकुंडी सापडली नाही तर तो माझ्यावर वैतागतो की तू मला सवय लावलीस आणि आता मला रस्त्यावर कचरा टाकवतच नाही. कुंडी सापडेपर्यंत हातातच धरावा लागतो.
मुंबईत जवळजवळ सगळे दुकानदार/होटेल्स वगेरे कचराकुंड्या ठेवतातच (पालिकेचा नियमच आहे तसा). तसेच रस्त्यांवर, रेल्वेस्थानकांवर वगेरे कचराकुंड्या असतातच. फक्त जरा २ मिनिटे देऊन त्यांच्याजवळ जाऊन कचरा टाकायची आपल्याला सवय लावावी लागते. आपण समाजाचेच घटक आहोत. म्हणून सुधारणा आपल्यापासुनच सुरू करायला पाहिजे असे मला वाटते.