कुंतीच्या एका चुकीमुळे कर्णाच्या पूर्ण आयुष्याची शोकांतिका झाली.

छान! चूक फक्त कुंतीची होती का? तिला नको त्या वयांत दुर्वासांकडे पाठवणाऱ्या तिच्या मानलेल्या बापाची नाही? तिला नको त्या वयात नको ते वर देणाऱ्या दुर्वासांची नाही? कुमारी मातेला अस्वीकृती दर्शवणाऱ्या समाजाची नाही? मला वाटतं महाभारताची एकच बाजू उचलून धरणे आणि त्यावर इतर कोणताही विचार न करता बोलणे सोपे आहे.

कर्ण सुतपुत्राऐवजी ज्येष्ठ पांडव असता तर त्याचा उदोउदो झाला असता

कर्णाचे मन वळवण्यासाठी कुंतीने अमिष दाखवले असेल पण त्याने तो पांडव झाला असता का? पंडू हयात असताना त्याच्या संमतीने पांडवांचा जन्म झाला म्हणून ते पांडव ठरतात. नाहीतर कर्ण, युधिष्ठीर, अर्जुन, भीम कौंतेय.

द्रौपदी, जी आधीच पाच जणांची बायको होती तिलाही काय फरक पडला असता?

हे वाक्य फारच विचित्र आहे, वाचून शिसारी आली. याला कोणत्याही प्रकारे उत्तर देणे मला अयोग्य वाटते. तेव्हा नो कमेंटस.

आणि कर्णाच्या चुकांबद्दल एवढं बोललं जातं तेव्हा मुळ पांडवांनी तरी असे काय गुण उधळले होते? स्वयंवरात द्रौपदीने प्रथम सुतपुत्राला वरणार नाही म्हणून अपमान केला, मयसभेत पाण्यात पडल्यावर आंधळ्या वडिलांवरून दुर्योधनाचा अपमान केला,

दौपदी पांडव होती काय? तिला आपला नवरा निवडायची मुभा होती म्हणूनच स्वयंवर रचले होते. स्वयंवर हा शब्द अर्थ स्पष्ट करतो.

लहानपणी भीम कौरव बसलेल्या झाडांना मुळापासून उपटून टाकत असे तेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न कौरवांनी करणे साहजिक होते.

कौरव, पांडवांना दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक देत हे भीमाच्या रागाचे मूळ नव्हते काय? कौरवांनी भीमाच्या रागाला प्रेमाने उत्तर दिल्याचे माझ्या वाचनात नाही.

महाभारत युद्धात नरो वा कुंजरो प्रकरणाने द्रोणाचार्यांना मारलं, भीष्म शिखंडीला मारणार नाहीत हे माहित असून त्याच्याकडून त्यांच्यावर शरवर्षाव केला, अर्जुनाच्या खुळचट प्रतिज्ञांमधून कृष्णाच्या धोरणीपणाने त्याला वाचवलं, जयद्रथ वधावेळी सावरून घेतलं, अर्जुनाने रिक्तहस्त कर्णावर बाण चालवला, युद्धाच्या शेवटी भिमाने मांडीखाली वार करून दुर्योधनाचा प्राण घेतला.

एकदा युद्ध सुरू झाल्यावर ते जिंकण्यासाठीच लढले गेले आणि तेही दोन्ही बाजूंनी. शिखंडीच्या मागून शरसंधान केल्यास मला मृत्यू येईल हे प्रत्यक्ष भीष्मांनीच सांगितले होते. युद्धात खोटेपणा केल्याचा परिणाम पांडवांना ताबडतोब आपल्या पुत्रांच्या मृत्युतून भोगावा लागला नाही काय?

मला तरी यात काही लार्जर दॅन लाईफ आणि चुकांची भलामण दिसत नाही.

यासाठी मूळ महाभारत वाचावे. मृत्युंजय, राधेय आणि कौंतेय या कादंबऱ्या म्हणून कधीही उत्तम आहेत.

असो. मूळ चर्चेत कोणीही पांडवांची भलामण केलेली नाही. आपण चर्चा पुन्हा वाचून पाहावी. चूक हे चूक असते आणि बरोबर हे बरोबर असते मग ते पांडवांनी केलेले असो किंवा कर्णाने. कर्णाला ट्रॅजिक हिरो असल्याचा फायदा मिळतो एवढेच.