आपण शर्टात अंग घालत असताना 'अंगात शर्ट घातला' म्हणतो; चपलेत पाय घालत असताना 'पायात चप्पल घातली' म्हणतो. अर्थाच्या दृष्टीने असे प्रयोग पूर्णतः चुकीचे आहेत, पण तरीही केवळ ते रुढ असल्यामुळे आपण दणकून वापरतोच ना ? ते वापरताना या चुका आपल्या ध्यानात तरी येतात का ?
मूळ संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत येताना त्यांचा अपभ्रंश होतो. इतकेच कशाला, मूळ इंग्रजीतल्या 'स्टुअर्ट, रिक्रूट, बटलर, डॅम बीस्ट' ई. शब्दांनी मराठीत येताना त्यांची कोटटोपी बदलून 'इष्टूर, रंगरुट, बुटेलर, डँबीस' असा मराठमोळा पोषाख चढवला. जर आपण आपल्या भाषेच्या शुद्धतेबद्दल इतके आग्रही आहोत तर परभाषेतील शब्दही आपण जसेच्या तसेच आपल्या भाषेत का आणीत नाही ?
सारांश काय, की 'शुद्ध' मराठीतही अनेक चुका असून त्या आपण नकळत स्वीकारलेल्या आहेत, मग 'आनि पानी लोनी' वरच इतकी आगपाखड का ?