व्यक्तिशः 'मृत्युंजय' लिहिण्यामागचा उद्देश कर्णाची भलामण करण्याचा किंवा कर्णासाठी 'अपॉलॉजिस्ट व्ह्यू' [मराठी?] मांडण्याचा नसावा, केवळ झाल्या घटनांचा एक 'अँगल' - कर्णाच्या दृष्टीतला - मांडणे, प्राप्त परिस्थितीत कर्णाची भूमिका मांडणे, त्याची मानसिकता दर्शवणे एवढेच लेखकाला साधायचे असावे, असे मला वाटते. अर्थात लेखकाच्या जबरदस्त शैलीमुळे त्याचा मूळ हेतू बाजूला सारला जाऊन परिणामी वाचकास कर्ण 'लार्जर दॅन लाइफ' भासण्याची किंवा लेखक कर्णाची बाजू - कदाचित अंधपणे - घेत आहे असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु तो लेखकाचा उद्देश मानता येणार नाही. शिवाजी सावंतांनी श्रीकृष्णावरही - श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून - दुसरी एक कादंबरी (युगंधर?) लिहिली आहे, हे लक्षात घेता, लेखकाचा उद्देश महाभारताच्या वेगवेगळ्या अंगांचा वेगवेगळ्या पात्रांच्या 'पर्स्पेक्टिव्ह्‌ज'मधून परामर्श घेणे एवढाच असावा, अशी एक शंका एक महाभारताचा सखोल अभ्यास करण्याच्या वगैरे भानगडीत न पडलेल्या आणि 'मृत्युंजय'सारख्या कादंबऱ्याही केवळ कादंबऱ्या म्हणून, फारशा खोलात न शिरता, कदाचित वरवरच वाचणाऱ्या माझ्यासारख्या एका अतिसामान्य वाचकास येते. चूभूद्याघ्या.

कर्णाबद्दलच म्हणाल तर तो एक महत्त्वाकांक्षी, कर्तबगार, मूळचा सद्गुणी परंतु परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेला हतबल इसम होता असे वाटते. आणि म्हणूनच त्याच्या दोषांचा विचार करता त्याच्या परिस्थितीचा, त्याच्या हतबलतेचा त्याच्या पायताणांतून, त्याच्या जागी आपण असतो तर काय केले असते किंवा प्राप्तपरिस्थितीत नेमके काय करू शकलो असतो, तसे करण्या किंवा न करण्याची आपल्यात मानसिकता राहिली असती का, मुळात तसे करण्याची आपल्यास त्या परिस्थितीत संधी उपलब्ध झाली असती का, मुळात आपल्यापुढे नेमके काय पर्याय उभे असते, पैकी त्या परिस्थितीत आणि त्या मानसिकतेत आपण नेमका कोणता प्राप्त पर्याय निवडला असता वगैरे बाबींचा पूर्णपणे विचार करून, थोडक्यात 'ज्यूरी ऑफ पियर्स'[मराठी?]च्या दृष्टीतून विचार करून मगच निवाडा करणे योग्य ठरावे. अर्थात त्याची दुष्कृत्ये क्षम्य नाहीतच, परंतु त्यामागील घटना, विचारप्रक्रिया आणि भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. ठरवून केलेला खून आणि रागाच्या किंवा भावनेच्या भरात झालेली हत्या या दोन्हीही हत्याच होत आणि दोन्हीही अपराधच खरे, पण निवाड्याच्या आणि शिक्षेच्या बाबतीत कायद्याच्या दृष्टीने त्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर गणले जाते, त्याप्रमाणे. किंवा कोणत्या परिस्थितीत कोणी कसे वागावे हे ठरवणे त्रयस्थास सोपे असते, परंतु प्राप्त परिस्थितीत तो माणूस वेगळाच वागू शकतो.

परशुरामाशी खोटे बोलणे, असंगाशी संग वगैरे गोष्टीही याच नजरेतून पाहता येतात. अर्थात त्या योग्य होत्या असे नेहमीच म्हणता येत नसले, तरी. (विशेषतः द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगी कौरवांची भलामण - केली असल्यास ['मृत्युंजय' आठवत नाही, त्यामुळे खात्री नाही, घरी जाऊन वाचून खात्री करावी लागेल, पण भलामण केली असे मानल्यास] - निश्चितच योग्य किंवा क्षम्य नाही. परंतु त्याचे एकंदरीत सदैव कौरवांना - विशेषतः दुर्योधनाला - उचलून धरणे त्याची परिस्थिती लक्षात घेता कदाचित समजून घेता येते.)

परशुरामाशी खोटे बोलण्याच्या प्रसंगासंबंधी असा विचार करून बघा - समजा मला एखादी विद्या अवगत करायची आहे, आणि ती विद्या देऊ करणारा एकच गुरू अस्तित्वात आहे. ती विद्या अवगत करायची माझी कुवत आहे आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची माझ्यात जिद्दही आहे, तशी महत्त्वाकांक्षाही आहे. परंतु केवळ माझी जात/वर्ण आणि त्या एकमेव गुरूचा हेकेखोरपणा यांमुळे त्या विद्येपासून मला वंचित ठेवण्यात येत आहे. ('इंडियन्स अँड डॉग्ज नॉट अलाउड'सारखे.) आता ती विद्या मिळवणे जर माझ्यासाठी इतकेच महत्त्वाचे असेल, आणि त्यापासून मला अन्याय्य मार्गांनी थांबवण्यात येणार असेल, तर मी ती कोणत्याही मार्गाने मिळवणार नाही का? अर्थात अशा वंचनेमागचा नियम तत्कालीन समाजाच्या विचारधारेनुसार वैध असेलसुद्धा, परंतु त्यातून जर माझ्यावर अन्याय होत असेल, तर माझ्याजवळ काय मार्ग उरतात? १. अशा अन्यायाविरुद्ध योग्य त्या न्यायाधिकाऱ्यासमोर [काँपीटंट ऑथॉरिटीसमोर] दाद मागणे. अशी माझ्या बाजूबद्दल सहानुभूती असलेली काँपीटंट ऑथॉरिटी सापडणे अशक्य नसलेच, तर महामुश्किल, त्यामुळे या मार्गाने मला न्याय मिळणे जवळजवळ अशक्य. २. 'सविनय कायदेभंगा'चा मार्ग अवलंबून परशुरामाला सांगणे की मी टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज सूतपुत्र आहे (आपण क्षत्रिय आहोत याबद्दल कर्णाला त्या क्षणी काहीही माहीत नव्हते; फार तर आपले पालनपोषण करणारे आपले आईवडील आपले जैविक आईवडील नव्हेत, आणि आपले जैविक आईवडील नेमके कोण आहेत हे ठाऊक नाही, एवढेच त्याला ठाऊक असावे.), तेव्हा तू मला बऱ्या बोलाने विद्या शिकवली नाहीस तर मी इथे सत्याग्रह करत बसेन. आता परशुराम हा चित्पावन होता असा एक प्रवाद जरी ऐकला असला, तरी तो ब्रिटिश निश्चितच नसावा (जरी चित्पावनांच्या उगमाबद्दल ते एक ब्रिटिश पुरुष आणि भारतीय स्त्री यांच्या संगमातून जन्माला आले असा एक प्रवाद येथे मनोगतावरच फार पूर्वी ऐकला असला तरी!), त्यामुळे परशुरामासमोर ही टॅक्टिके टिकली नसती. त्यामुळे माझ्यासमोर मार्ग उरतो एकच. ३. परशुरामाला आपल्या जातीचा खोटा दाखला देणे. आता हे नैतिकदृष्ट्या चूक जरी असले, तरी कर्णाला त्याबद्दल दोष कसा देता येईल? दोष परिस्थितीचा आहे - त्याने प्राप्तपरिस्थितीत जे शक्य होते तेच केले.

कौरवांना उचलून धरण्याबद्दलही असेच. लायकी असूनसुद्धा तमाम क्षत्रियवर्ग त्याला तुच्छ लेखत असता एकट्या दुर्योधनाने त्याला उचलून धरले आणि राजा बनवले, ज्यायोगे इतर क्षत्रियांना तोंड देताना त्याला 'पातळीचा फरक' आड येऊ शकला नाही. आता हे करताना दुर्योधनाची त्यामागची भावना कर्णाप्रति मित्रत्वाची वगैरे मुळीच नसून कर्णासारखा एक कर्तबगार योद्धा आपल्याशी सदैव बांधील ठेवणे, जेणेकरून युद्धप्रसंगी त्याला आपल्या बाजूने 'वापरून घेता' येईल, एवढेच राजकारणी धोरण त्यामागे होते, हे आपल्याला कळू शकते. परंतु कर्तबगार असून आपल्याला कोणीच भाव देत नाही अशा परिस्थितीत हाच काय तो आपल्याला उचलून धरतो हे दिसता तो आपला मित्र आहे अशी चुकीची कल्पना जर कर्णाची झाली, तर त्याला दोष देता येईल काय? फार तर त्याला जगातले छक्केपंजे नीटसे कळत नव्हते आणि निष्ठा वगैरे चुकीच्या तथाकथित सद्गुणांना तो नको तितके मानत होता असे म्हणता येईल. आणि मग हे तथाकथित मित्रत्व, मित्रनिष्ठा, उपकाराची आणि परतफेडीची भावना यांच्या अतिरेकी आणि चुकीच्या कल्पनांतून जेथेतेथे, चूक किंवा बरोबर असले तरी, कौरवांना उचलून धरणे हे ओघाने आलेच. ('माय कंट्री, राइट ऑर राँग'सारखे.) द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगानंतरसुद्धा आपल्या या तथाकथित मित्राची निर्भर्त्सना न करता येण्यामागे ही मिंधेपणाची भावना आड आली असावी. कदाचित आपण दुर्योधनाचे आश्रित आहोत, दुर्योधनाघरचे श्वान आहोत, ही भावना त्याच्या मनाच्या कोठल्यातरी कोपऱ्यात सुप्तपणे घर करून असावी काय?

बाकी 'द्रौपदी, जी आधीच पाच जणांची बायको होती तिलाही काय फरक पडला असता?' हे वाक्य वाचून शिसारी येण्याबद्दल पूर्णतः सहमत. पण मग बायकोचे वर्णन भिक्षा म्हणून करू शकणाऱ्या पांडवांबद्दल, ती भिक्षा वाटून घ्या म्हणून सांगणाऱ्या आणि सत्यपरिस्थिती कळल्यावरही आपली आज्ञा मागे न घेणाऱ्या कुंतीबद्दल आणि ती आज्ञा बैलोबासारखी शिरसावंद्य मानून द्रौपदीला 'वाटून घेणाऱ्या' पुन्हा पांडवांबद्दल काय म्हणता येईल?

बाकी कर्णाच्या बाबतीत चूक केवळ कुंतीची होती की इतरांचीही हा मुद्दा सर्वस्वी गौण आहे. चूक कोणाचीही असो, आणि एका(की?)ची किंवा अनेकांची, पण त्या चुकीचे परिणाम मात्र एकट्या कर्णाला विनाकारण भोगावे लागले हे मात्र खरे.

बाकी परशुरामाशी खोटे बोलण्याच्या बाबतीत 'कवच कुंडले गेल्यावर इंद्राने कर्णाला वासवी शक्ती दिली होती. तिचा उपयोग इतरत्र झाला तरी अर्जुनाशी दोन हात करण्यास कर्णाला आपले शौर्यच पुरेसे होते पण परशुरामांचा शाप महाग पडला.' हा मुद्दा थोडासा 'हाइंडसाइट इज ट्वेंटी-ट्वेंटी'सारखा वाटला.

बाकी 'पांडव म्हणजे धर्माची बाजू आणि कौरव म्हणजे अधर्म अशी जी मांडणी झाली आहे ती का?' या प्रश्नाचे उत्तर 'कारण शेवटी जेतेच इतिहास लिहितात' एवढेच देता येईल.

अवांतर: द्रौपदीला आपला वर निवडण्याची पूर्ण मुभा होती, किंबहुना त्यासाठीच स्वयंवर रचले होते, याबाबत सहमत. आणि या निवडीसाठी कोणताही निकष लावण्याची तिला मुभा असणेही इष्टच होते. मग तो निकष सूतपुत्रांना वरकरणी कितीही अन्याय्य असला तरी. हा शेवटी तिचा खाजगी मामला होता, द्रुपदाच्या समाजकल्याणखात्याची एखादी योजना नव्हे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांना समान संधी किंवा टेंडरे मागवून सर्वात कमी किमतीचे टेंडर स्वीकारणे वगैरे भानगडीही त्यात येण्याचे काही कारण नव्हते. शेवटी तिची निवड हा अंतिम निकष होता; तिला सूतपुत्रालाच वरावे असे मनापासून वाटले तर तिला तसे करण्याची पूर्णपणे मुभा असावी, पण सक्ती निश्चितच नव्हती, जे रास्तच आहे. सामाजिक न्याय हा असा कायदे किंवा सक्ती करून येत नाही, तो मनापासून यावा लागतो. या बाबतीत पूर्वी मनोगतावरच घडलेली एक चर्चा आणि त्यातले मुद्दे या अनुषंगाने आठवले.