व्यक्तिशः 'मृत्युंजय' लिहिण्यामागचा उद्देश कर्णाची भलामण करण्याचा किंवा कर्णासाठी 'अपॉलॉजिस्ट व्ह्यू' [मराठी?] मांडण्याचा नसावा, वाचकास कर्ण 'लार्जर दॅन लाइफ' भासण्याची किंवा लेखक कर्णाची बाजू - कदाचित अंधपणे - घेत आहे असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही,

लेखकाचा विचार आणि उद्देश काय असावा हे लेखकच जाणोत. येथे चर्चा लेखकाच्या सोकॉल्ड व्ह्यूबद्दल चालली नसून कर्णाला असे मांडल्याने तो बरोबर ठरतो का त्यावर आहे. अर्थात,  त्याचे परिणाम येथे दिसून येत आहेत ते फारसे आल्हाददायक वाटत नाहीत. हिटलर, रास्पुटीन आणि काही इतर यांच्यावर अशीच पुस्तके लिहिल्याने ते कोणीतरी ग्रेट हिरो होते असे लोकांना वाटते त्यातलाच प्रकार.

कर्णाबद्दलच म्हणाल तर तो एक महत्त्वाकांक्षी, कर्तबगार, मूळचा सद्गुणी परंतु परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेला हतबल इसम होता असे वाटते.

हे आपण कशावरून ठरवलेत? मृत्युंजय वाचून? कर्ण हा अतिमहत्त्वाकांक्षी, उर्मट, आपल्या शौर्याचा मको तेवढा गर्व असलेला होता. अर्जुनाशी वैरत्वाची भावना ठेवण्याचे कारण सांगता येईल का? अर्जुन तर राजपुत्र होता, तो कर्णाच्या वाटेला गेला नव्हता, उलट कर्णाला अर्जुनाविषयी असूया होती. कर्ण कुंतीकडे राहता तर त्याला कसे जीवन जगावे लागते याची कल्पना नाही पण अधिरथ-राधेने त्याला पुत्रवत प्रेम दिले. महाभारतात कर्णाच्या फोस्टर पेरेंटसनी त्याला कधी वाईट वागणूक दिल्याचे दिसत नाही तर मग तो परिस्थितीच्या कचाट्यात कसा सापडतो? (केवळ कुंतीचा पुत्र होता म्हणून? केवळ कुंतीचे पुत्र असते तर पांडवांची किंमत काय होती? ती किंमत पंडुचे पुत्र असल्यानेच मिळाली नाही का? कर्णाला आपले जन्मरहस्य माहितच नव्हते तोपर्यंत तर मग तो परिस्थितीच्या कचाट्यात कधी आणि कसा सापडला?)

परशुरामाशी खोटे बोलण्याच्या प्रसंगासंबंधी असा विचार करून बघा - समजा मला एखादी विद्या अवगत करायची आहे, आणि ती विद्या देऊ करणारा एकच गुरू अस्तित्वात आहे.

केला. खोटं हे कोणत्याही परिस्थितीत खोटं असतं, चूक ही कोणत्याही परिस्थितीत चूक असते आणि ती उघडकीला आल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. जे कर्णाचे झाले. प्रश्न कर्णाने खरं किंवा खोटं बोलण्याचा नाही. माणूस प्राप्त परिस्थितीनुसार सर्व करतो पण ते बरोबर असे म्हणता येत नाही. परशुरामांचा कोपीष्ट स्वभाव पाहता कर्णाला परिणामांची जाणीव असावी. मागे एकदा सुनिता या मैथिलीच्या गोष्टीत ती बाई अनेक अन्यायानंतर  विसा परमिट नसताना नोकरी धरते तेव्हा आपणच विरोधी सूर उठवल्याचे आठवते.  

कौरवांना उचलून धरण्याबद्दलही असेच. लायकी असूनसुद्धा तमाम क्षत्रियवर्ग त्याला तुच्छ लेखत असता एकट्या दुर्योधनाने त्याला उचलून धरले आणि राजा बनवले, ज्यायोगे इतर क्षत्रियांना तोंड देताना त्याला 'पातळीचा फरक' आड येऊ शकला नाही.

चूक. कर्णाला हिणवले गेले ते त्याच्या उर्मट स्वभावामुळे. महाभारताच्या वेळी जातीव्यवस्था थोडी रुजली होती पण इतकी कडक नव्हती की लोक आरामात एकमेकांना हिणवतील. महाभारतच का त्यानंतरच्या अनेक हजारो वर्षांतही तशी व्यवस्था नव्हती. वर नाम्यांनी म्हटल्याप्रमाणे संजय सूत होता. विदुर दासीपुत्र होता, सौती सूत होता. सूतपुत्र हे हिणवण्याचे नाव होते असे महाभारतात कोठेही म्हटलेले नाही. 'मी सूतपुत्राला वरणार नाही' असे द्रौपदी सांगते त्यात ते जातीविषयक कशावरून? त्यावेळी सूत, सौती, सूतपुत्र असे संबोधायची प्रथा होती. तेव्हा हिणवणे, क्षत्रियांनी खाली दाखवणे या सगळ्या बाता आहेत. बाकी, मिंधेपण, दुर्योधनाचे श्वान हे देखील तुमचीच विशेषणे.  

अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण म्हणून कर्णाने आपला सारथी शल्याला बनायला लावले. श्रीकृष्णाचा चतुरपणा शल्याला दाखवायची गरज नव्हती त्यामुळे त्याला केवळ घोडे चालवायचे काम हाती आल्याने अपमानास्पद वाटले आणि तो कर्णाला हिणवत राहिला. पण याचे कारणही कर्णाचा उर्मटपणाच आणि हेही कारण त्याला युद्धात हरण्यास कारणीभूत ठरले.

पण मग बायकोचे वर्णन भिक्षा म्हणून करू शकणाऱ्या पांडवांबद्दल, ती भिक्षा वाटून घ्या म्हणून सांगणाऱ्या आणि सत्यपरिस्थिती कळल्यावरही आपली आज्ञा मागे न घेणाऱ्या कुंतीबद्दल आणि ती आज्ञा बैलोबासारखी शिरसावंद्य मानून द्रौपदीला 'वाटून घेणाऱ्या' पुन्हा पांडवांबद्दल काय म्हणता येईल?

हे आपण लिहावेत याचे खरंच वाईट वाटले. इथे कर्ण योग्य की पांडव की कुंती हा प्रश्न आहे का? मी पुन्हा लिहिते चूक हे चूक असते आणि बरोबर हे बरोबर - मग पांडव असोत की कौरव - इथे मात्र प्रत्येकजण हा वाईट तसा तो वाईट मग याचा वाईटपणा त्याच्या वाईटपणापेक्षा कमी कसा हे दाखवतोय. इथे प्रश्न फक्त दौपदीचा आहे. दौपदीला पाचांची पत्नी होण्याचा आदेश आवडला नव्हता पण मान तुकवावी लागली. कर्णाला तिचे ऑफरींग केले असते तर तिला ते ही कदाचित मानावे लागले असते.

पण म्हणून कोणी असे म्हणावे की ती पाचांची पत्नी होती,सहाव्याची असती तर काय फरक पडला असता. सौरभांना जे लिहायला टाळले ते येथे लिहिते. पुरुष असा विचार करतो का की 'माझी बायको एकाची पत्नी आहे, दुसऱ्याची असेल तर तिला काय फरक पडतो?' दुसरे उदाहरण पाहिले तर वेश्याही आपली गिऱ्हाईके आपल्या मर्जीने निवडते, दौपदीला तर आपला इतिहास पाचांची पत्नी असून साध्वी मानतो. (ते का मानतो हे मृत्युंजयसारख्या कादंबऱ्या वाचून कळणे कठिण आहे.) तिच्याविषयी असे उद्गार मला खरंच शिसारी आणण्यागत वाटले.

बाकी कर्णाच्या बाबतीत चूक केवळ कुंतीची होती की इतरांचीही हा मुद्दा सर्वस्वी गौण आहे. चूक कोणाचीही असो, आणि एका(की?)ची किंवा अनेकांची, पण त्या चुकीचे परिणाम मात्र एकट्या कर्णाला विनाकारण भोगावे लागले हे मात्र खरे.

नक्की कोणते परिणाम? आणि कुंतीकडेच राहता तर कुमारी मातेचा पुत्र म्हणून कोणते परिणाम भोगावे लागते? ते सांगता येईल का? वाचायला आवडेल.

'पांडव म्हणजे धर्माची बाजू आणि कौरव म्हणजे अधर्म अशी जी मांडणी झाली आहे ती का?' या प्रश्नाचे उत्तर 'कारण शेवटी जेतेच इतिहास लिहितात' एवढेच देता येईल.

हेच तर सांगते आहे की व्यासांनी पांडवांची बाजू धर्माची मानली आणि जेते म्हणून ते नायक ठरले. कादंबरीकारांनी कर्णाला महत्त्व दिले म्हणून तो खरा वाटतो पण हे सर्व करताना येथील रथी महारथी माझे मूळ वाक्य विसरले ते नाइलाजाने पुन्हा लिहिते. आयुष्यात, राजकारणात आणि युद्धात कोणीही सतत बरोबर नसतो किंवा सतत चुकीचा. जे समाजव्यवस्थेनुसार बरोबर आहे ते बरोबर म्हणावे लागते जे चुकीचे आहे ते चुकीचे.

अवांतरः माझ्या कोणत्याही प्रतिसादांत मी पांडवांची भलामण केलेली नाही पण कर्ण चूक होता तर पांडव कोठे बरोबर होते अशा आशयाचे येथील एक एक प्रतिसाद पाहता या विषयावर अधिक बोलणे बरे वाटत नाही. माझे ज्ञान येथील महारथींपेक्षा तोकडे वाटते.