आमच्याकडे घरी रिलायन्सचा "हॅल्लो फोन" आहे. मागच्या महिन्याच्या बिलात ०१२३४ या नंबराचे १ रु. २५ पैसे बिल आले. सहज एक चाळा म्हणून हा नंबर डायल केला होता. पण ह्या नंबरचा कॉल पूर्ण होऊच शकत नाही तरी बिल का आले म्हणून ग्राहकसेवेकडे त्याची तक्रार नोंदवली असता पाहून सांगतो असे त्यांनी कळवले. पण आठवडाभर काहीच प्रतिसाद नाही.
प्रत्येक वेळी कॉल सेंटरच्या *३३३ नंबरला फोन केला तर *३७७ ला करा आणि *३७७ ला केला तर *३३३ ला करा असे सांगत.
नंतर रिलायन्सच्या इमेल आयडीवर मेल पाठवून तथाकथित सेवा देणाऱ्या कॉल सेंटर वरच्या एजंटांची नावे व त्यांनी दिलेल्या "सेवेची" वेळ सांगितली आणि जर माझा १.२५ परत दिला नाही तर बिलाची झेरॉक्स पेपरात देईन आणि तुम्ही खोटारडेपणा करून कसे लुबाडता ते सगळ्यांना कळेल असे सांगितले. शिवाय असे कॉल सेंटर एजंट असले तर कंपनीचे दिवाळे लवकरच निघेल या वाक्याला अधोरेखित करून फोन बंद करण्याची विनंती केली.
सर्व प्रयत्न फळाला आले व ह्या महिन्यात १.२५ + सर्विस चार्ज ९ पैसे परत मिळाले. शिवाय त्यांचे क्षमापत्रही.
मराठीत सेवा देत नाहीत म्हणून टाटा इंडिकॉम व रिलायन्सकडे सेवा-विनंती दिली आहे. मराठी पर्यायाचे बटण असूनही नंतर येणारा एजंट हा सरळ हिंदी/इंग्रजी सुरू करतो. अशी तक्रार सर्वांनीच दिली तर थोडा उपयोग होऊ शकतो.