घरच्या घरी बनवण्यासाठी कंदिलाच्या मध्यभागात वापरायची प्लॅस्टिकची रिंग असणे आवश्यक आहे. बाजारातून कधी कंदिल आणला तर त्याची ही रिंग जपून ठेवावी. दरवर्षी वापरता येते.या रिंगच्या परिघावरून कार्डशीटची लांबी (या कंदिलात ती साधारण ४६ सेमी होती) ठरवावी व कंदिलाची उंची साधारणपणे १९ सेमी असावी. कार्डशीट मध्ये नंतर प्रकाश बाहेर येण्यासाठी रिकाम्या जागा चित्रात दाखवल्याप्रमाणे तयार कराव्यात, नळकांडे तयार करावे व प्लॅस्टिकची रिंग त्यात बसवून घ्यावी.
                      ज्या रंगाचा आकाशकंदिल करायचा आहे त्या रंगाचे दोन पतंगाचे कागद आणावेत. एक पूर्ण कागद झुरमुळ्यांसाठी  वापरावा व दुसऱ्या कागदातून १० गुणिले १० सेमीचे चौरस कापून घ्यावेत. या चौरसाचा कर्ण साधारणपणे १४ सेमी येईल. पूर्ण १९ सेमी उंचीतले १४ सेमी गेल्यावर उरलेली जागा वर आणि खाली त्याच रंगाची एक पट्टी लावण्यासाठी वापरावी. कापलेल्या चौरसांची दोन टोकं जोडावीत व तयार झालेले भाग कार्डशीटच्या नळकांड्याला चिकटवावेत. वर आणि खाली त्याच रंगाच्या कागदाच्या पट्ट्या लावाव्यात.यानंतर दुसरा रंगीत कागद वापरून झुरमुळ्या तयार कराव्यात. थोडी जागा चिकटवण्यासाठी ठेवावी व झुरमुळ्या लावून घ्याव्यात. एवढं झाल्यावर सोनेरी रंगाच्या पट्ट्या लावाव्यात की घरच्या घरी बनवलेला आकाशकंदिल तयार! दरवर्षी वेगवेगळे रंग वापरावेत आणि दिवाळी झाल्यावर प्लॅस्टिकची रिंग पुढच्या वर्षासाठी जपून ठेवावी.