अभ्यासिका शब्दाचा तुम्ही सांगितलेला अर्थ माहीत होता. ह्या संकेतस्थळावर बरेच विद्वान, जाणकार येत असतात, अशी मला शंका आहे.  (म्हणजे येत असतात आणि मी समजतो त्याप्रमाणे ते विद्वान आणि जाणकार आहेत अशी शंका) प्रश्न विचारण्यापूर्वी अभ्यास करावा असे सुचविण्यात काही मजा नाही. प्रश्न पडला (मग तो कितीही मूर्ख का असेना) तो विचारायला हवा असे मला वाटते. एखादा प्रश्न कुणी विचारला की अनेक उत्तरे जशी येतात तसेच अनेक प्रश्नही पडतात. त्यामुळे मंथन होते आणि ह्याचा आनंद वेगळा आहे. असो.

दुसरा मुद्दा, मराठीत एखादा संस्कृत शब्द दाखल झाला की त्याचे वर्तन थोडेसे बदलत असेलच की नाही. तसेही मराठी आणि संस्कृत ह्या दोन्ही भाषांचे व्याकरणे वेगळी आहेत आणि वेगळीच समजायला हवीत, असे तज्ज्ञ म्हणतात ते उगाच का? संस्कृत ह्या जगातल्या सर्व भाषांची जननी आहे आणि ह्या भाषेत जगातले सर्व ज्ञान आहे, असे काहींना अजूनही वाटते. त्यांच्याशी मला इथे वाद घालायचा नाही. ते त्यांचे मत आहे. मी त्यांच्याशी सहमत नाही एवढेच.