तीन वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेने रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाले हटविण्यासाठी खाजगी सुरक्षारक्षक नेमले होते व त्याचा चांगला परिणामही दिसू लागला होता. परंतु काही दिवसातच सामान्य माणसाला ज्यांच्या अस्तित्वाची कल्पनाही नसेल अशा दबाव गटांनी आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी ठाणे महानगरपालिकेची ही कारवाई हाणून पाडली. चकाचक मुंबईच्या बाबतीत असेच घडले तर आश्चर्य वाटायला नको. वैद्यांनी चकाचक मुंबई असा उल्लेख केला असला तरी महानगरपालिकेच्यालेखी (व बहुसंख्य वर्तमान पत्रांच्यालेखी) ती 'क्लीन अप मुंबई कॅम्पेन' आहे व ती 'मार्शल'करवी राबवली जाते. आपल्या योजनांसाठी मुंबई महानगरपालिकेला जपखल मराठी शब्दही मिळत नाहीत हा दैवदुर्विलास आहे.