गेले बरेच दिवस ही चर्चा वाचते आहे. चर्चाप्रस्ताविकेला काय म्हणायचे आहे काय सांगायचे आहे ते अद्याप कळलेले नाही. सरळ शब्दांत सांगायचे तर,

वैशालीताई, तुम्हाला किंवा ओळखीच्या स्त्रीला घरात जाच होत असेल तर आई-वडिलांशी बोला, मनोगत हा काही पर्याय नाही. ती स्त्री किंवा तुम्ही  कमावत्या नसाल, H4 वर असाल आणि ९११ डायल करायचे मनात असेल तर नवऱ्याला पकडून नेल्यावर किंवा कोर्टकचेऱ्या सुरू झाल्यावर घरात ग्रोसरी भरून देणारे, खायला घालणारे आणि घराचे भाडे देणारे मागे कोणीतरी आहे याची खात्री करून घ्या. ९११ डायल करणे हा उपाय कधी होतो याची आपल्याला विशेष माहिती आहे का? नसल्यास ती करून घ्या. कुंकू लावायला सांगितले किंवा पांढरे कपडे घालू नकोस सांगितले तर ९११ डायल करावासा वाटत असेल तर लग्न न केलेले बरे होते की.

जर कुंकू आणि मंगळसूत्राचा तुम्हाला अभिमान आहे आणि भारतीय स्त्रीने ते लावले नाही तर तुम्हाला वाईट वाटत असेल तर ते विसरल्यावर तिला कोणी बोल लावत असेल तर वाईट वाटण्यासारखे काय आहे? हे तर होणे आलेच कारण ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान/ प्रेम वाटते ते करायला तुम्ही चुकलात तर राग/ ओरडणे हे येतेच येते. आता तुम्हाला कुंकू लावणे किंवा मंगळसूत्र घालणे पसंत नसेल आणि नवरा ते बळजबरीने करू इच्छित असेल तर समजू शकते.

जर तुमच्या शेजारणीला सफेत कपडे वापरायला आवडत असतील आणि नवरा ते वापरू देत नसेल त्यामागची त्याची अंधश्रद्धा त्याच्या जीवाशी निगडित असेल तर हळूवारपणे समजवा की नवऱ्याला. नाहीच समजला तर पुन्हा प्रयत्न करा काही दिवसांनी आणि त्यातूनही नाही समजला तर आहेत की  जगात उरलेले २५५ रंग ते वापरा. एका रंगासाठी नवऱ्याला कोणी दूषणे का द्यावीत बुवा? आणि अंधश्रद्धा तर जगात सर्वत्रच असते. शिक्षणाशी त्याचा काय संबंध?  स्वतः अमेरिकनच अतिशय अंधश्रद्ध असतात.

जर तुम्ही नोकरी करत असाल तर आरामशीर सांगू शकता की मी हे काम करणार नाही, मला वेळ नाही. पैसे देऊन साफसफाईची कामं करून घ्या. मुलांची कामे करू नका दोन दिवस. नवऱ्याचीही करू नका, तिसऱ्या दिवशी प्रत्येकजण आपापली कामे करू लागेल. पण तुम्ही नोकरी करत नसाल तर मात्र तुमचा नवरा कामं करत नाही यावर विश्वास बसणे कठिण आहे. कारण घरातली कामं तुम्ही केलीत तर बाहेरची सर्व कामं त्याला करावी लागतात नाही का? त्यात खरेदी, बँक, गाडीची कामं, गवत कापणे, स्नो काढणे अशी अनेक कष्टांची कामं असतात. ती तोच करतो ना? अमेरिकेत नवरा बायको दोघे राबतात. दुर्दैवाने नवरे ऑफिसात बॉसच्या आणि एकावेळेस अनेकांच्या हाताखाली राबतात. घरातल्या स्त्रीला ते करावे लागत नाही.