सतीश जकातदार यांची प्रतिक्रिया वाचून हसू आले. उद्दामपणे "ही आमची पहिलीच वेळ होती" वगैरे सांगून केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रम करण्याची पहिलीच वेळ असणे हे चुका करण्याचे परवानगीपत्र नसते. जर झेपत नसेल तर असे काम घेऊ नये.
चेक न भरण्याचे दिलेले कारण तर विनोदाचा उत्तम नमुना आहे.
प्रेक्षकांना किती त्रास होतो वगैरे गोष्टींची कोणीही कलावंत आजकाल फिकीर करत असेल असे वाटत नाही - आपले पैसे मोजून घेतले की झाले - त्यामुळे आशाताई त्यांच्याबरोबर पुढे कार्यक्रम करणार याचा अर्थ आम्ही सगळे चांगलेच करत आहोत हा सोयीस्कर अर्थ सतीशरावांनी लावला आहे. स्वतःला त्रास झाला तरी दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मनस्ताप सहन करून अशी पत्रे लिहिणाऱ्यांनी आपली तोंडे मुकाट बंद ठेवावीत हे सांगण्यासाठी वापरलेली औपरोधिक शैली तर जबराच.
सदर कार्यक्रमास मिळणाऱ्या बऱ्यावाईट प्रसिद्धीमुळे छायाताईंचा काडीचाही फायदातोटा नाही ही साधी गोष्ट जरी सतीशरावांनी लक्षात घेतली असती तरी लोकसत्ता वाचकांचे व त्यांच्या भावी ग्राहकांचे इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यासाठी त्यांनी एवढी आगपाखड केली नसती.
असो. हत्ती चालला आपुल्या गती अशा भावनेने काम चालू ठेवावे. नाहीतरी आता हत्तीचेच दिवस येणार आहेत.