वर्णावरून, वेशावरून, भाषेवरून (आणि भारतात जातीवरून) पंक्तिप्रपंच सगळीकडेच चालतो. जगभर बाहेरचे, वेगळे वगैरे लोक एकतर उच्च नाहीतर 'खालचे' मानले जातात, बरोबरीचे, सारखे नाही. पण यातून कोणाला त्रास होत असेल, कोणाचा जीव जात असेल तर तो वर्णद्वेष. 'वेगळी नजर' मला युरोपात सगळीकडेच पहायला मिळाली. पण शारिरीक त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. बरोबरच्या डोक्याला रुमाल बांधलेल्या स्थानिक मुस्लिम मुलींना मात्र अडवून छेडछाड करण्याचा प्रकार बघण्यात आला.
लंडन हे मुंबईसारखे धावते शहर आहे. तिथे सामान्यांमध्ये वर्णद्वेष काय, वेगळी नजरही कधी मला जाणवलेली नाही. अर्थात मी खोल उपनगरांमध्ये कधी गेले नाही हेही खरे. लंडनमधल्या दोनेक वर्षांपूर्वी झालेल्या स्फोटातले बरेचसे संशयित आपल्यासारखे तपकिरी रंगाचे होते. तिथे पाकिस्तानातून अतिरेक्यांची सतत निर्यात चाललेली असते. आणि नैसर्गिकरित्या आपण नि आपले शेजारी बांधव सारखे दिसतो. त्यामुळे विमानतळावर वगैरे कधी कधी जास्तीची सुरक्षा चाचणी द्यावी लागते. 'गोरे अतिरेकीही असतात मग आमचीच का चाचणी' असा प्रश्न पडतोच. पण एकेवेळी लंडनमध्ये हिथ्रो विमानतळावर अशी सगळ्यांचीच चाचणी घेण्यात आली आणि विमानांना इतका उशीरा झाला की विमानतळावर लोकांना पथाऱ्या पसरून राहावे लागले. असो.
जसजसे अधिकाधिक भारतीय, तपकिरी लोक युरोपात राहू लागतील तसतसा प्रश्न सुटेल.