सुसंस्कृत आणि परिपक्व भाषा ही केवळ एक 'नाद' म्हणून वापरावी हे आमचे विचार नाहीत. आमचे म्हणणे असे आहे की, जर अशा शब्दांचा अधिकाधिक वापर भाषेत होत राहील तरच ती भाषा दिवसेंदिवस परिपक्व होत जाईल.
भाषा हि काही ठराविक वर्षात तयार होत नसते. अनेक तपे आणि शतके उलटल्यावर त्यातते बदल हे ठळकपणे जाणवू लागतात. वेगवेगळ्या सामाजिक प्रवाहातून काही ना काही घेत ती पुढे जात असते. आपल्या भाषेची उंची वाढवणे ही सर्वस्वी आपली सर्वांची जबाबदारी आहे.
अशा संस्कृत अथवा सौंदर्यलक्षी शब्दांमुळे मूळ मुद्दा बाजूला राहून अनेकजण मुद्दा सोडून देतात काय? आम्हाला तसे मुळीच वाटत नाही. आपल्याला माहित नसलेले शब्द आणि वाक्य जर आपल्यासमोर आले तर आपण ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी दरवेळी हातात शब्दकोश घेऊन फिरण्याची गरज नसते. संदर्भ माहित असला तर त्यातून बिनचूक जरी नाही मिळाला तरी जवळचा अर्थ नक्किच मिळतो.
आपण वर्तमानपत्र वाचताना, एखाद शब्द नाही कळला म्हणून का ते बाजूला सारतो? नव्हे नव्हे, आपण संदर्भातून अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. वारंवार त्या शब्दांचा वापर आपणापर्यंत पोहोचला तर तो शब्द आपल्या इतका अंगवळणी पडतो की तो कधीही कोशातून पहायची गरजही पडत नाही.
आमची प्रामाणिक मते आम्ही मांडली आहेत. लोभ आहेच.
आपला,
(तार्किक) धोंडो भिकाजी जोशी.