आपली आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या युद्ध नेतृत्वाबद्दल माहितीपूर्ण लेखमाला नुसती सुंदर आहे असे म्हणण्यापेक्षा ती मला विलक्षण आवडली. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझ्या अभ्यासाच्या टेबलावर काही नेत्यांचे फोटो असावयाचे त्यात सुभाषचंद्रांचा फोटो असावयाचाच. त्यावेळी शौर्याचे जास्त आकर्षण होते आणि स्वाभाविकच सुभाषचंद्र आदर्श होते. पुढे कॉलेज शिक्षणात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी राज्यशास्त्र विषय असल्यामुळे राजकीय इतिहासाची आवड आणि अभ्यास करावयाला लागला. नेताजींबद्दल पूर्ण आदरभाव तसाच असतानाही काही गोष्टींबाबत आपण शंका निरसन कराल अशी आशा बाळगतो.
(१) नेताजींना मिळालेले सैनिक हे जर्मनांच्या कैदेत असलेले ब्रिटिश सैनिक होते.अतिशय हाल झाल्यामुळे दयनीय अवस्थेत होते.त्याना कैदेत पोसण्यापेक्षा हिटलरने त्याना कदाचित मारून टाकले असते. हिटलरलाही ते सैनिक ठेवणे जडच होते. स्वाभाविकच नेताजीनी विचारल्यावर हिटलरने ते कैदी नेताजींना देऊन टाकले. ह्या सैनिकांची शारिरीक क्षमताही कमी होती. नेताजीना मिळालेली शस्त्रास्त्रे ही जर्मनी आणि जपानकडून मिळालेली होती . ती सुद्धा पुरेशी होती का? नेताजीना मिळालेल्या थोड्या वेळात सैन्याचे ऑर्गनायझेशन प्लॅनिंग आणि इतर पूरक सेवा ह्यांचा मेळ बसवण्यातच त्यांचा बराचसा वेळ गेला असणार. ह्या सैनिकांची सर्वात मोठी आणि महत्वाची बाब म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि प्रखर देशभक्ती ह्यामुळे वाट्टेल ते करून दाखविण्याची जिद्द. एक देशभक्ती सोडली तर अपूर्ण साधनसामग्रीनिशी प्रचंड सामर्थ्यशाली ब्रिटीशांबरोबर लढाई करणे ही काही साधी गोष्ट नव्हती.
(२) पर्ल हार्बरवर घणाघाती हल्ला करून जपान्यानी अमेरिकन आरमार आणि त्यांचा अहंकार नेस्तनाबूत केला. त्यापासून धडा घेऊन ब्रिटिशानी त्यावेळच्या बर्मामधून माघार घेऊन इंडियात जपान्यांशी दोन हात करावयाचे ठरविले आणि ब्रिटिश इंफाळपर्यंत आल्यानंतर थांबले.त्यांच्या मागून येणा-या आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांशी कोठे कोठे लढाई केली आणि त्यांना पराभूत केले त्या ठिकाणांची नावे आणि माहिती दिल्यास सदैव उपकृत राहिन.
(३) आझाद हिंद सेनेने इंम्फाळमधे प्रवेश केला होता का?
(४) ब्रिटिश सेनेतल्या हिन्दी सैनिकानी त्यावेळी काय भूमिका घेतली होती?
(५) ब्रिटिश सेनेतल्या किती सैनिकानी ब्रिटिशांची नोकरी सोडून आझाद हिन्द सेनेत प्रवेश केला होता?
(६) एका बाजूला एक स्वातंत्र्यसेनानी ब्रिटिश सेनेतल्या जर्मन कैदी झालेल्या सैनिकांना घेउन आझाद हिन्द सेनेची स्थापना करून ब्रिटीश सत्त्तेशी दोन हात करून हिन्दुस्तानला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे तर दुस-या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकर तरुणांना ब्रिटिश सैन्यात सामिल होण्यास आवाहन करीत होते. कारण त्यामुळे हिन्दी लोकाना सैनिकी शिक्षण मिळेल व त्याचा पुढे स्वातंत्र्य युद्धात उपयोग होइल. ह्यात कोणाची विचारसरणी जास्त प्रभावी होती. ह्या बाबत आपण काही विचार व्यक्त कराल का?
भावनेपेक्षा वास्तविकता जाणून घेण्याच्या उद्देशामुळे ह्या शंका.