भारतीय श्रेष्ठ नाहीत असे नाहीत पण बहुतेक विषयांतील मूलभूत ज्ञान इ. सर्व टॉल टेल्स असतात. वाचावे, आनंद घ्यावा आणि सोडून द्यावे. त्यावर विश्वास ठेवणे हे अंधश्रद्धेचे आधुनिक लक्षण मानावे लागेल.
सहमत. यामागे बऱ्याचदा "भारतीयांना बहुतेक विषयांतील मूलभूत ज्ञान असे" किंवा "भारतीयोच्छिष्टं जगत्सर्वम्" ही मूलभूत अंधश्रद्धा आणि ती काहीही करून सिद्ध करण्यासाठी ओढूनताणून त्या थिअरीवर पुरावे बसवणे ही प्रक्रिया घडत असावी.
या पद्धतीने काय वाटेल ते सिद्ध करता येत असावे. जसे, "येशू ख्रिस्त हा खरा यशोदेचा कृष्ण होता", वगैरे. किंवा, शाळेत असताना आमच्या एका वर्गमित्राच्या तोंडून एक अफलातून (आणि केवळ शाळकरी वयातच सुचू शकेल अशी स्टुपिड) कल्पना ऐकली होती, त्याप्रमाणे. ("भारतात पुरातन काली स्कूटरी होत्या" हे सिद्ध करण्यासाठी एक बजाजची बऱ्यापैकी जुनी, मोडकळीला आलेली आणि गंजकी स्कूटर घ्यायची, तिच्यावर जेथे कोठे असतील ती सर्व मार्किंग्ज ऍसिड वगैरे वापरून नष्ट करायची, मग एक मोठा, खोल खड्डा खणून त्यात ती पुरायची आणि मग नंतर एके दिवशी डांगोरा पिटायचा की "अरे, काल रात्री मला स्वप्न पडलं की अमूकअमूक ठिकाणी खोदलं की पेशवेकालीन (येथे पेशव्यांच्या ठिकाणी आपल्याला हवा तो काळ घालावा.) स्कूटर सापडेल म्हणून!". मग पत्रकार परिषद वगैरे घेऊन भरपूर प्रसिद्धी वगैरे द्यायची, वगैरे. (स्कूटर पेशवेकालीन होती हे सिद्ध करण्यासाठी काय करायचे याचे तपशील मात्र आमच्यासारख्या भाविक श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीवर सोडले होते. ))
विश्वास ठेवणारे काय, वाटेल त्यावर विश्वास ठेवतील!
अर्थात, काही बाबतीत काही विषयांवर भारतीयांना प्राथमिक ज्ञान असेलही, किंवा निदान ज्ञान किंवा प्रत्यक्ष डेवलपमेंट नसली तरी एखाद्या विषयाबद्दल कल्पना, विचार किंवा थिअरी सार्वत्रिक प्रसारात नसली तरी एखाद्या ऋषीकडे असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. परंतु ही कल्पना म्हणा किंवा थिअरी म्हणा, जोपर्यंत एखाद्या ऋषीकडेच किंवा एखाद्या ग्रंथातच राहिली, तिचा सार्वत्रिक प्रसार झाला नाही आणि त्यावर अधिकाधिक लोकांनी विचारविनिमय किंवा संशोधन करून तिची अधिक घडण (डेवलपमेंट) केली नाही आणि त्यामुळे ती सामान्य वापरात आली नाही आणि त्यामुळे एखाद्या मर्यादित गटाकडेच राहून आणि वापर न होताच जर लोप पावली, तर "भारतीयांना या गोष्टीचे मूलभूत ज्ञान होते"ला काही अर्थही नाही आणि उपयोगही नाही, आणि म्हणूनच भारतीयांकडे (ऍज अ होल) त्याचे श्रेय जाऊ शकत नाही. उदाहरण घ्यायचे झाले, तर फारा वर्षांपूर्वी 'किर्लोस्कर'सारख्या प्रतिष्ठित (आणि सहसा विश्वासार्ह) मासिकात एक गोष्ट वाचली होती. गोष्टीच्या सत्यासत्यतेबद्दल कल्पना नाही, पण तूर्तास सत्य आहे असे मानून चालू. रामायणातील पुष्पक विमानाबद्दल वाचून आणि 'पुरातन कालात भारतात विमानांबद्दल कल्पना होती' या कल्पनेने, ती सिद्ध करण्यासाठी मुंबईच्या पीडब्ल्यूडी खात्यात नोकरी करणाऱ्या शिवराम तळपदे नामक गृहस्थाने जुने ग्रंथ मिळवून, त्यांचा अभ्यास करून त्यावर आधारित एक विमानाची प्रतिकृती (मॉडेल) बनवून ती चौपाटीवर उडवून दाखवली होती, आणि तेही राइट बंधूंच्या प्रथम विमानोड्डाणाच्या काही वर्षे आधी, १८९६ की १८९७ साली. पुढे मात्र आर्थिक पाठबळ नसल्यामुळे हा मनुष्य त्याबद्दल काही करू शकला नाही, आणि त्याची ड्रॉइंग्ज़ वगैरे त्याच्या वारसांनी अत्यल्प किमतीत (रद्दीच्या भावाने म्हणा ना!) विकून टाकली, अशी काहीशी कथा होती. ही कथा विश्वासार्ह आहे असे जरी मानले, तरी जोपर्यंत पुराणकाळात भारतात शतकानुशतके प्रत्यक्षात विमाने सर्रास किंवा अधूनमधूनही उडत नसत, किंवा या विषयावर एक प्राथमिक कल्पना यापलीकडे भारतात अधिक संशोधनही झाले नव्हते (तळपद्यांचा एक मूळ कल्पनेच्या सहस्रावधी वर्षांनंतर झालेला अतिप्राथमिक प्रयोग सोडल्यास), तोपर्यंत भारतीयांना विमानाच्या शोधाचे श्रेय घेण्याचा किंवा 'भारतीयांना विमानविद्येचे प्राथमिक ज्ञान होते' म्हणून सुखावण्याचाही अधिकार नाही. एखाद्या भारतीयाला कधीकाळी कल्पना आली असेलही, भारतीयांना कल्पना नव्हती. आणि असली तरी त्यावर अधिक घडण करून ती प्रत्यक्षात आणण्याच्या भानगडीत पडले नाहीत, तर काय उपयोग?
तसेच म्हटले तर दा विंचीच्या रेखाटनांतून हेलिकॉप्टर या प्रकाराची त्याच्या डोक्यात प्राथमिक कल्पना (डिज़ाइनसह) आली होती, हे कळते. किंवा ज्यूल्स व्हर्नच्या सायन्स फिक्शन कथांवरून त्याच्या डोक्यात पाणबुडी या प्रकाराची प्राथमिक कल्पना असावी. आणि हे सर्व हेलिकॉप्टर किंवा पाणबुडीचा प्रत्यक्ष शोध लागण्याच्या खूपच आधी. पण म्हणून हेलोकॉप्टरच्या शोधाचे श्रेय दा विंचीला किंवा पाणबुडीच्या शोधाचे श्रेय ज्यूल्स व्हर्नला कोणी देत नाही.
अवांतरः
एडसचा उल्लेख आयुर्वेदात येतो म्हणजे एडस भारतात होता आणि लागण भारतीयांद्वारे इतरांना झाली की भारतातील आयुर्वेदाचार्य आफ्रिकेत स्वंयसेवा करायला गेले होते?
यावरून, "शेर का बच्चा हूँ" म्हणून फुशारक्या मारणाऱ्या एका सद्गृहस्थास, "क्या शेर तेरे घर में आया था, कि तेरी माँ जंगल में गयी थी?" हा प्रश्न विचारला गेला होता, तो विनोद आठवला.