आपले विचार तर्कसंगत आहेत. प्राचीन भारतात दूरध्वनीच्या जमिनीखालून जाणाऱ्या तारा सापडत नाहीत. त्यावरून आपल्याकडे त्याकाळात भ्रमणध्वनी सर्रास वापरात होते असेही काही जण म्हणू शकतील. आधुनिक विज्ञान हे सबळ पुरावे मागते. तरीही काही सुस्पष्ट लिखित उल्लेख आहेत ज्याकडे दुर्लक्षून चालणार नाही.यातील काही खगोलशास्त्राशी संबंधित आहेत. ग्रह आणि तारे यांची ही नावे पहा. ही प्राचीन काळापासूनच प्रचलित आहेत. या नावांना केवळ योगायोगाने पडलेली किंवा गंमत म्हणून दिलेली नावे असे म्हणून चालणार नाही.

गुरूः सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. नुसत्या डोळ्यांनी पाहता गुरूचा क्रमांक तेजस्विता आणि आकारमान यात शुक्राच्या नंतर लागतो. साध्या निरीक्षणाने शिक्रच सर्वात मोठा अशी समजूत होऊ शकते. `गुरू' हा  आपल्या संस्कृतीत सर्वात आदरणीय आणि मोठा मानला आहे. त्यामुळेच सर्वात मोठ्या ग्रहाला गुरू असे सुसंगत नाव तर दिले नाही ना? हा केवळ आकारमानाने मोठा नसून गुरू पृथ्वीवर धडकू शकणाऱ्या अनेक संभाव्य धूमकेतूंपासूनही आपले रक्षण करतो.

मित्र: हा सूर्याला सर्वात जवळ असणारा दृश्य तारा. ४.३ प्रकाशवर्षे. सर्वात जवळचा कोण? अर्थात मित्र. पाशात्य नाव अल्फा सेंटॉरी. याहूनही जवळचा आहे प्रॉक्सिमा सेंटॉरी. पण तो दुर्बिणीतूनच दिसतो. वरील उदाहरणाप्रमाणे साध्या डोळ्यांनी सर्वात मोठा आणि तेजस्वी दिसतो तो व्याध तारा. तो आहे ८ प्रकाशवर्षे अंतरावर. मग मित्र हे सहज म्हणून दिलेले नाव असेल?

मूळ: (मूल नक्षत्र) : दक्षिण दिशेला  वृश्चिक राशीत त्या विंचवाच्या नांगीत दिसणारा तारकासमूह. या ठिकाणी जेव्हा आपण बघत असतो तेव्हा  प्रत्यक्षात आपण आपल्याच आकाशगंगेच्या केंद्रस्थानाकडे पाहात असतो. केंद्र अर्थात मूळ किंवा इंग्रजीत रूट. हे नाव पण पाहा किती चपखल आहे.

वरील सर्व उदाहरणे उगीचच अभिमानापोटी दिलेली नाहीत. प्रा. मोहन आपटेंसह अनेक विद्वान लोकांनी ही उदाहरणे लेखांमधून दिली आहेत आणि ही नावे प्राचीन आहेत असेही सांगितले आहे.पण त्या काळात आधुनिक उपकरणे नसताना त्यांनी हे कसे शोधून काढले असेल याची कारणमीमांसा दिलेली आढळत नाही. आपल्यापैकी कुणाला याबद्दल अधिक माहिती असल्यास कृपया मनोगतवर सांगावी.

या खेरीज आर्यभट्टाने खगोलशास्त्रात मोलाची कामगिरी केली आहे जी युरोपीयन शास्त्रज्ञांच्या किमान १००० वर्षे आधीची आहे व याचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. उदा. त्याने त्याकाळात काढलेले सूर्याचे पृथ्वीपासून काढलेले अंतर, इतर ग्रहांचे सूर्यापासून अंतर आणि आधुनिक विज्ञानाला माहित असलेले अंतर यात फार तफावत नाही.

पायथागोरस प्रमेय, पाय ची किंमत (३.१४) असे असंख्य शोध युरोपच्या आधी भारतात लागले आहेत. याबद्दल नंतर अधिक माहिती देईन.