या उल्कावर्षावाबद्दल उशीराच सांगितले हे एकप्रकारे बरेच झाले. कारण अपेक्षेइतक्या उल्का दिसल्या नाहीत.
काल आजतकवर उल्कावर्षाव होणार अशी बातमी सांगितली होती. पण कधी कधी खात्रीलायक उल्कावर्षावही दगा देतात. मी काल रात्री १०:३० पासून पाहायला सुरूवात केली. विद्युत दिव्यांच्या प्रकाशामुळे क्षितिज लाल रंगाने उजळून निघाले होते. शहरी भागातील या प्रकाश प्रदूषणामुळे बऱ्याच उल्का दिसू शकत नाहीत.
सुरूवातीला २-३ छान तेजस्वी उल्का दिसल्या. पण बहुतेक काळ उल्काविनाच गेला. आता दिसतील आता दिसतील म्हणून २ वाजेपर्यंत वाट पाहिली. तशा अधे मध्ये काही तेजस्वी लांबलचक निळ्या- हिरव्या रंगाच्या उल्का दिसल्या. काही लहान पण तेजस्वी उल्का प्राजक्ताची फुले पडावीत तशा हळुवारपणे जात होत्या. पण थोडक्यात सांगायचे तर घोर निराशा झाली. उल्का `वर्षाव' सोडा पण `छीटपुट बारिश' ही झाली नाही.
असो..हा उल्कावर्षाव सहसा दगा देत नाही. २००४ साली कोकणातून हाच उल्कावर्षाव पाहिला होता, तेव्हा एका रात्रीत ३०० हून अधिक उल्का मोजल्या होत्या. पुढीलवर्षी १४ डिसेंबरला भलामोठा चंद्र मिथुन राशीतच आहे. त्यामुळे उल्का निरीक्षण अशक्यच.
ऋषिकेशने ढगांचा उल्लेख केलेला सिंह राशीतील उल्कावर्षाव १९९९ मधील. पण त्यानंतर २००१ साली याबद्दल विशेष वाच्यता झाली नाही. नेमक्या त्याच वर्षी १९ नोव्हेंबरच्या पहाटे सिंह राशीतून उल्कांचा धो धो पाऊस पडला होता. ४० हून अधिक अग्निगोल आणि ८ बोलॉइड्स दिसले.हे शुक्राहून कितीतरी अधिक तेजस्वी होते. शुक्राची प्रत ही -४.५ असते. या उल्का -८ प्रतीच्या होत्या आणि त्यांच्या प्रकाशामुळे वस्तूंची सावली पडत होती.साध्या उल्का तर कितीतरी! त्या रात्रभरात १३०० उल्का पडल्या. लोकसत्तामध्ये यावर "आणि सिंह खरोखरच गर्जला " या शीर्षकाचा लेख आला होता. असे उल्कावादळ (मिटिऑर स्टॉर्म) आयुष्यात एखादया वेळीच पाहायला मिळते. गुरूच्या गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे टेंपेल-टटल धूमकेतूमुळे होणारा लिओनिडस उल्कावर्षाव पुढील ९० वर्षे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसणार नाही असा खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
माझ्या मते असे उल्कावर्षाव हे खगोलीय घटनांमधील खग्रास सूर्यग्रहणा नंतरचे किंबहुना तेवढेच विलोभनीय असे दॄष्य असते.पण रात्रीचे जागरण करावे लागत असल्याने गैरसोयीचे ठरते. मुंबईच्या नेहरू तारांगणात एक भले मोठे कृत्रिम आकाश आहे. त्यात आकाशातील तारे अगदी हुबेहुब दाखवले जातात. तेथील कार्यक्रमात लिओनिड्स सारख्या उल्कावर्षावांचे प्रतिरूप दाखवल्यास कृत्रिम का होईना पण उल्कावर्षावाचा आनंद लोकांना लुटता येईल.
आता १४ डिसेंबर उलटून गेल्याने वरील लेखाचे महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे गद्य विभागातील हा लेख पुसून टाकावा अशी प्रशासकाना विनंती.