सर्वप्रथम हा महत्त्वाचा विषय चर्चेस आणल्याबद्दल आपले स्वागत आणि हार्दिक अभिनंदन!

दहशतवाद्यांसमोर मुळीच झुकायला नको असे माझे नम्र मत आहे. लष्करी कारवाई करून अपहृतांना सोडवावे. त्यात ओलीस गेलेल्या नागरिकांपैकी कुणाचे प्राण गेल्यास त्यांना, सीमेवर लढतांना वीरमरण आल्यावर जसे जवानांना आदराने वागवले जाते, तसेच वागवल्या जावे. दहशतवादासमोर एकदा झुकले की पुन्हा-पुन्हा झुकावेच लागते. त्यामुळे कधीही झुकू नये. याबाबत इस्राएलचे धोरण अभ्यास करण्याजोगे आहे.

समजा उद्या मी प्रवास करत असलेल्या विमानाचे अपहरण झाले आणि त्यावेळेस झालेल्या लष्करी कारवाईत मला एखाद-दुसरी गोळी लागून मृत्यूही आला तरी त्याचा मला किंवा माझ्या कुटुंबीयांना अभिमानच वाटेल. हे लिहिणे सोपं आहे. पण, नियमितपणे तशी सर्वांच्या मनाची तयारी करून देणे अवघड आहे. आपल्याकडून जेवढा प्रयत्न होतो तेवढा करायचा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांवर भारताने वेळप्रसंगी अण्वस्त्रे टाकण्यासही कमी करू नये. कारण, इतर अण्वस्त्रसंपन्न देशही असे करायला कमी करणार नाहीत. सज्जनपणा म्हणजे नेभळटपणा नव्हे. दुर्बळांच्या शांततेला कच-यापेक्षा अधिक किंमत नसते. त्यामुळे भारत हे शस्त्रसंपन्न राष्ट्र असून; त्याच्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर किंवा सार्वभौमत्वावर आक्रमण करणा-या कोणत्याही राष्ट्रास किंवा समूहास, कडक धडा शिकवायची धमक येथील जनतेत आहे, हे सगळ्या जगाला दाखवून देणे फारच गरजेचे झालेले आहे. यात मतपेट्यांचे राजकारण आड येऊ नये हीच एका सामान्य माणसाची अपेक्षा!

भारताला महासत्ता व्हायचे असेल तर "तुम्ही महासत्ता झालात" असे प्रमाणपत्र मिळवायची वाट आपली माध्यमे (वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या) का पाहतात हे कळत नाही. कुठल्याही वाहिनीवर किंवा वृत्तपत्रात अमेरिकेच्या किंवा इतर प्रगत राष्ट्राच्या अमुक-तमुक सोम्या-गोम्याने काय म्हटले आहे ह्याला फारच महत्त्व देण्यात येते. यात वृत्तपत्र किंवा वाहिन्यांवर टिका करण्याचा उद्देश नसून परकीयांच्या ओंजळीने विचार करण्याची वृत्ती सर्वत्र किती हाडीमासी भिनली आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. सारांश, सिंहाला डरकाळी फोडण्यासाठी कोल्ह्या-कावळ्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही हे हृदयात भिनले की या प्रश्नांवर काय धोरण असावे हे ठरवणे फारसे अवघड जाणार नाही.

जय भारत!