शैलेशरावांच्या इतर मतांशी बहुतांश सहमती असली तरी इस्त्रायल व अण्वस्त्रे ही दोन मते खटकली.

इस्त्रायलला स्वातंत्र्य हे साधारण भारताच्याच बरोबरीने मिळाले (१९४८ च्या सुमारास) त्यानंतर झालेल्या बहुतेक युद्धांमध्ये इस्त्रायलला विजयही मिळाला आहे मात्र असे असून परिसरात शांतता प्रस्थापित करणे इस्त्रायलला अद्यापही शक्य झालेले नाही. किबहुना या परिसरात केवळ शस्त्रसंधीच्याच काळात (अराफत वगैरेंचा शेवटचा काळ) थोडीफार शांतता असावी. दहशतवादाचा प्रश्न धाकदपटशाने सोडवणे शक्य नाही हे यावरून अधोरेखित व्हावे. इस्त्रायलविरुद्ध अरबांनी दुसऱ्या इंतिफदा द्वारे नव्या जोमाने सुरू केलेला लढा आणि सप्टेंबर ११, २००१ रोजी अमेरिकेवर झालेला हल्ला, ओसामा बीन लादेन समवेत दहशतवाद्यांनी प्रामुख्याने इस्त्रायल व अमेरिकेविरुद्ध उभारलेले युद्ध याला मध्यपूर्वेतील धोरण व इस्त्रायल - अमेरिकेची या प्रश्नाची हाताळणी या गोष्टी जागतिक दहशतवादाला प्रामुख्याने जबाबदार आहेत असे बरेच लोक माननात.  इस्त्रायलचे परिसरामध्ये असलेले वर्चस्व हे केवळ इस्त्रायलचे एकट्याचे आहे हे मानणे भाबडेपणाचे ठरेल. अमेरिकेचा थेट व छुपा पाठिंबाही त्यामागे आहे. अमेरिकेने इस्त्रायलला विरोध करणे सुरू केले तर इस्त्रायलचे लष्कर त्या देशाचे संरक्षण करू शकेल असे वाटत नाही.

अण्वस्त्रांचा वापर ही भयानक गोष्ट आहे हे जपानमध्ये सिद्ध झाले होते. सध्याची एक पिढी संपूर्ण बरबाद करून येणाऱ्या पुढील पिढ्यांच्या गुणसूत्रांमध्ये, जीवरचनेमध्ये, पर्यावरणामध्ये व संपूर्ण वातावरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची ताकद अण्वस्त्रांमध्ये आहे. केवळ सध्याच्या राज्यकर्त्यांच्या चुकांमुळे अण्वस्त्रांचा वापर केल्याची शिक्षा पुढील पिढीला कित्येक काळ भोगावी लागेल हे निश्चित. केवळ डोळे वटारण्यासाठी अण्वस्त्रे असणे ठीक पण त्यांचा वापर नको.

अवांतरः

१. किंबहुना अटलबिहारी सरकारने अण्वस्त्रसिद्धता जाहीर केल्यानंतर पाकिस्तानने लगेच काही दिवसांनी तसेच केल्याने जागतिक पातळीवर दोन्ही राष्ट्रांना एकाच तागडीत तोलले जाऊ लागले असेही बरेच तज्ज्ञ मानतात.

२. या तुलनेत कोस्टा रिका सारखा देशाने १९५० नंतर संरक्षण दल  न बाळगण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतरही त्या देशावर कोणी आक्रमण केलेले नाही हे उद्बोधक आहे.