आता आताच ही बातमी ईसकाळात वाचली आणि ह्या लेखाची आठवण झाली. सर्वांना वाचता यावी म्हणून ती येथे देत आहे.

ई सकाळातली मूळ बातमी : जागतिक चित्पावन महासंमेलन येत्या रविवारी पुण्यात होणार

पुणे, ता. १७ - महाराष्ट्र चित्पावन संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त होणारे पहिले जागतिक चित्पावन महासंमेलन येत्या रविवारी (ता. २३) पुण्यातील चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे ६२ हजार जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती संघाचे कार्यवाह अशोक वझे यांनी आज पत्रकारांना दिली.
संघाचे अध्यक्ष रमेश दामले, अनिल नेने, दिनेश ओक, दिलीप ओक या वेळी उपस्थित होते.

वझे म्हणाले, ""महासंमेलन दोन सत्रांत होणार असून, सकाळच्या सत्रात चित्पावनांच्या सुमारे १४० आडनावांचे कुलसंमेलन होणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चित्पावन व्यक्तींच्या मुलाखतीचा कार्यक्रम महासंमेलनादरम्यान होणार आहे. माहिती तंत्रज्ञान, संगीत, कला, प्रसारमाध्यम आदी क्षेत्रांतील संधी व व्यवसायाच्या नवीन वाटा या विषयावर "शैक्षणिक कार्यशाळा' होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होईल. दुपारच्या सत्रात होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते होणार आहे. या सत्रात गणेशवंदना, नृत्यांचे कार्यक्रम व चित्पावन संस्कृती दर्शविणारा "फॅशन शो' व शहरातील चित्पावनांच्या २८ पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करणे आदी कार्यक्रम होतील.''

या महासंमेलनास विविध २२ देशांमधून सुमारे ८० हजार जण उपस्थित राहणार आहेत. संघातर्फे सुरू करण्यात आलेल्या या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही परदेशातील नागरिक संपर्कात आहेत, असेही वझे यांनी या वेळी नमूद केले.