मूळ चर्चा दहशतवादाबाबत काय धोरण असावे यावर आहे. यावर माझा आधीचा प्रतिसाद वाचून इस्त्रायल व अण्वस्त्रे या दोन स्वतंत्र मुद्द्यांची गल्लत होऊन वाचकांच्या मनात गोंधळ होऊ नये म्हणून सविस्तर विवेचन करत आहे. संरक्षण तज्ञांना कदाचित हा भाग आधीच सुस्पष्ट असेल, परंतू सर्वांच्या सहभागासाठी विस्तार आवश्यक आहे.

मूळ मुद्दा क्र. १ - "दहशतवादासमोर एकदा झुकले की पुन्हा-पुन्हा झुकावेच लागते. त्यामुळे कधीही झुकू नये. याबाबत इस्राएलचे धोरण अभ्यास करण्याजोगे आहे."
विवेचन - १.१) इस्त्राएल दहशतवाद्यांशी कधीही बोलणी करत नाही. १.२) दहशतवाद्यांवर लष्करी कारवाई करून केवळ नेमके लोकच टिपण्याचे त्यांचे धोरण आहे. थोडक्यात, ते इतर नागरिकांचा नाहक बळी जाणार नाही याचा प्रयत्न निश्चित करतात. यामुळे दहशतवाद्यांना (निष्पाप नागरिक लक्ष्या झाल्याने मिळणारी) फुकटची सहानुभूती मिळत नाही किंवा तुलनेने कमी मिळते. १.३) इस्त्राएलची एल-अल ही विमानसेवा जगातील सर्वाधिक सुरक्षित विमानसेवा मानल्या जाते. तेथे विमानात साध्या वेशात प्रत्येक उड्डाणात एयर मार्शल असतात. विमान आकाशात असतांना कोणत्याही दहशतवाद्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केल्यास ते त्यास ठार करायलाही कमी करत नाही.

या सर्व गोष्टी म्हणजेच पर्यायाने दहशतवादाबाबत इस्राएलचे धोरण अभ्यास करण्याजोगे आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे अभ्यास करण्याजोगे याचा अर्थ अनुकरणीय आहेच किंवा नाहीच असा नाही. राष्ट्रीय धोरणांबाबत हंसाप्रमाणे नीरक्षीरविवेक आवश्यकच ठरतो.

मूळ मुद्दा क्र. २ - सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांवर भारताने वेळप्रसंगी अण्वस्त्रे टाकण्यासही कमी करू नये. कारण, इतर अण्वस्त्रसंपन्न देशही असे करायला कमी करणार नाहीत. सज्जनपणा म्हणजे नेभळटपणा नव्हे.
विवेचन - २.१) भारताने अण्वस्त्रांचा प्रथम उपयोग करणार नाही असे पोखरणच्या पाच अणुचाचण्यांनंतर घोषित केले होते. २.२) मात्र, इतरांनी आपल्याविरूद्ध अण्वस्त्रे वापरल्यास आपण काय करणार त्याचेही धोरण ठरवायला हवे. २.३) आजपर्यंत युरोपातील विविध देशांतील पोलिसांनी १६ वेळा रशियातून चोरण्यात आलेल्या आणि अण्वस्त्रे बनवण्यास उपयुक्त सामग्री पकडली आहे. त्यामुळे आज-ना-उद्या दहशतवाद्यांच्या हाती अण्वस्त्रे लागण्याचा संभव आहे असे दिसते. ती अण्वस्त्रे त्यांच्या हाती लागण्याची वाट न पाहणे हेच इष्ट आहे. २.४) अमेरिकेने जपानवर टाकलेली अण्वस्त्रे ही महाभयंकर आणि संहारक होती. ती त्यांनी निर्दोष नागरिकांवर टाकली आणि त्या कृत्याचे कोणीही कधीही समर्थन करू शकत नाही. खुद्द अमेरिकेतही ज्या पक्षाच्या अध्यक्षांनी (डेमोक्रॅटिक पक्षाचे हॅरी ट्रुमन) त्यास संमती दिली तो पक्ष आजतागायत क्लिंटन यांचा अपवाद वगळता फारसा सत्तेत येऊ शकलेला नाही. जेथे केवळ द्विपक्षीय पद्धती आहे त्या अमेरिकेची ही कथा तर इतरत्र विचारही करायला नको. २.५) मात्र, दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांवर भारताने वेळप्रसंगी अण्वस्त्रे टाकण्यासही कमी करू नये. इथे वेळप्रसंगी हा शब्द फारच महत्त्वाचा आहे. कमी शक्तीची अण्वस्त्रे जेथे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ मोठ्या प्रमाणात एकत्रित झाले आहेत त्या प्रदेशावर का टाकू नये? दहशतवादाचे मूळ राजकिय आहे की नाही हा स्वतंत्र मुद्दा आहे. परंतू, त्यांची कार्यशैली एका मानसिक दृष्टीने विकृत आणि पशूपेक्षाही नीच अशी असते याचे सगळ्यात अलीकडचे उदाहरण म्हणजे बेनझीर भुत्तोच्या मिरवणूकवर झालेला हल्ला हा होय. त्यात त्यांनी एका ६-८ महिन्याच्या अर्भकाचा शस्त्र म्हणून वापर केला. मागील वाक्य टंकन करणेसुद्धा मला असह्य झाले होते. परंतू, दहशतवादी ते कृत्य करून मोकळेही झालेत! यावरूनच आपली मानसिकता आणि दहशतवाद्यांची मानसिकता यातील अंतर ध्यानी येते. २.६) अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांना सक्रिय पाठींबा देणा-या देशांवर (त्यांच्या दहशतवादाचे प्रशिक्षण देणा-यां तळावर) भारताने वेळप्रसंगी (योग्य शक्तीची) अण्वस्त्रे टाकण्यासही कमी करू नये. २.७) आजानुकर्णांच्या वाक्यात शक्यतो हा शब्द जोडल्यास, "केवळ डोळे वटारण्यासाठी अण्वस्त्रे असणे ठीक पण शक्यतो त्यांचा वापर नको." आणि मी दिलेल्या विवेचनात तात्त्विकदृष्ट्या फारसा फरक नाही असे मला वाटते.

इतर मुद्देही (कोस्टा रिका इ.) ऊहापोह करण्यास घेता येतील, परंतू त्यावर स्वतंत्र चर्चा सुरू व्हाव्यात असे वाटते.