इस्रायल या मुद्द्याबाबत माझे किंवा शैलेशरावांचे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याबाबत काही विवेचन.
मूळ मुद्दा क्र. १ - "दहशतवादासमोर एकदा झुकले की पुन्हा-पुन्हा झुकावेच
लागते. त्यामुळे कधीही झुकू नये. याबाबत इस्राएलचे धोरण अभ्यास करण्याजोगे
आहे."
विवेचन - १.१) इस्त्राएल दहशतवाद्यांशी कधीही बोलणी करत नाही.
हे चुकीचे वाटते. इस्रायलने यासर अराफत यांच्यासह अनेक दहशतवाद्यांशी वेळोवेळी चर्चा केल्या आहेत. या चर्चा दहशतवाद्यांबरोबरच इस्रायलनेही कितपत गंभीरपणे घेतल्या हा प्रश्नच वाटतो. मध्यपूर्वेतील दहशतवाद्यांचे पाकिस्तानी दहशतवाद्यांप्रमाणेच अनेक गट आहेत. त्यातील फतह या मवाळ गटाशी इस्रायलने बऱ्याच चर्चा केल्या आहेत. तुलनेने अतिशय कडव्या असणाऱ्या हमासचे नाव आपण जास्त ऐकतो. हमासला इस्रायलचे अस्तित्त्वच मान्य नाही त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याच्या कल्पना फारशा गंभीरपणे घेतल्या जात नसाव्यात.
१.२) दहशतवाद्यांवर लष्करी कारवाई करून केवळ नेमके लोकच टिपण्याचे त्यांचे
धोरण आहे. थोडक्यात, ते इतर नागरिकांचा नाहक बळी जाणार नाही याचा प्रयत्न
निश्चित करतात. यामुळे दहशतवाद्यांना (निष्पाप नागरिक लक्ष्या झाल्याने
मिळणारी) फुकटची सहानुभूती मिळत नाही किंवा तुलनेने कमी मिळते.
ह्या मुद्द्याशीही असहमती आहे. वर उल्लेख केलेले लेबॅनोनचे युद्धच नव्हे तर अगदी देशांतर्गत पॅलेस्टिनी नागरिकांच्या छावण्यांवर सरसकट हल्ले करण्यात येतात. याच मुद्द्याच्या अनुषंगाने डिसेंबर २००७च्या नॅशनल जिओग्राफिकमध्ये बेथलहॅम बद्दल लेख आला आहे. त्या लेखातील आशयानुसार, इस्रायलने अनेक प्रांतांमध्ये बळजबरीने घुसखोरी केली आहे. खालील नकाशातील ग्रीन लाईन (हिरवी रेषा) ही मूळ ताबारेषा असताना, "संरक्षक भिंतीच्या" नावाखाली इस्रायलने सुमारे १२ ते १५ मैल आतपर्यंत घुसखोरी केली आहे. पाणी, पिकांसाठी योग्य जमीन आदी गोष्टींचे आधीचेच दुर्भिक्ष्य त्या प्रदेशात असताना बहुतांश समृद्ध प्रांत इस्रायलने बळजबरीने हस्तगत केले आहेत.
इस्रायलचा त्या जमिनीवरील दावा हा "ओल्ड टेस्टामेंट" मधील काही विधाने व डेव्हिड आणि गोलिएथ यांच्या लढाईवर आधारित आहे असेही मानले जाते. यामध्ये डेव्हिड हा ज्यू लोकांचा राजा तर गोलिएथ हा तत्कालीन फिलिस्तानी(!) राक्षस असल्याने आताही फिलिस्तानी-पॅलेस्टिनी लोक त्याचे वंशज म्हणजे राक्षस आहेत असे गृहित धरले जाते. नॅशनल जिओग्राफिकच्या याच अंकात इस्रायली आर्मीच्या धोरणांबद्दल टिप्पणी करताना मोहम्मद शरिया नावाचा मुलगा त्याच्या वडिलांकडे केस कापण्यासाठी पैसे मागायला आला असता इस्रायली सैनिकांच्या धाडसत्रामध्ये त्याची हत्या झाली. सदर हल्ल्याबद्दल स्पष्टीकरण देताना इस्रायली संरक्षण दलाने "प्रत्येकाची वैयक्तिक तपासणी करणे शक्य होत नाही" अशा अर्थाचे कारण दिले. अर्थात पुढे या हत्येचा वापर हमासने "स्वातंत्र्ययुद्धातील हुतात्मा" असे शब्द वापरून अधिक दहशतवादी संघटनेत भरण्यासाठी केला. बेथेलहॅम परिसरातील पॅलेस्टिनी छावण्यांमध्ये जॉर्डन-सीरिया प्रांतातील अतिरेक्यांची मदत मिळणे शक्य नसल्याने ते लोक डेव्हिड गोलिएथ गोष्टीप्रमाणे आताही दगडफेक करतात. फक्त यावेळी दगड फेकणारे लोक पॅलेस्टिनी आहेत.
नॅशनल जिओग्राफिक मासिक अमेरिकन प्रकाशन असल्याने त्यांचे सर्वच मुद्दे हे संपूर्णपणे व सर्व दृष्टीने योग्य असतील असे मानणे योग्य ठरणार नाही. सदर लेखाचा मूळ उद्देश हा इस्रायलच्या धोरणांमुळे मुस्लिमांसोबत मध्यममार्गी ख्रिश्चनही त्या परिसरातून निघून जात आहेत व काही दिवसांनी "येशू ख्रिस्ताच्या भूमीत एकही ख्रिश्चन असणार नाही" वगैरे प्रकारचाही आहे.
मात्र इस्रायलच्या एकूणच धोरणांकडे एक वेगळा दृष्टीकोण म्हणून या लेखाच्या आधारे पाहणे अयोग्य ठरणार नाही.
१.३)
इस्त्राएलची एल-अल ही विमानसेवा जगातील सर्वाधिक सुरक्षित विमानसेवा
मानल्या जाते. तेथे विमानात साध्या वेशात प्रत्येक उड्डाणात एयर मार्शल
असतात. विमान आकाशात असतांना कोणत्याही दहशतवाद्याने गोंधळ करण्याचा
प्रयत्न केल्यास ते त्यास ठार करायलाही कमी करत नाही.
हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.