ठरवून करायला घेतले की लक्ष 'करण्या'कडे असण्यापेक्षा जास्त 'ठरवलंय मग करायलाच हवं' या मानसिकतेकडे जास्त जातं असं मला वाटतं. माझा भाऊ न चुकता दर मंगळवारी गणपतीला जायचा. दोनेक महिने झाले असतील, त्याच्या या नित्यनियमाला. मग मध्येच कोणीतरी म्हटलं की जर ठरवून सलग पाच मंगळवार करायचे म्हटले तर होत नाहीत.. झालं ! त्याने मनाशीच ठरवलं की करायचेच सलग पाच मंगळवार.. आणि गंमत म्हणजे जितक्या वेळेस त्याने ठरवलं तितक्या वेळेस ते नाही झालं. मग शेवटी त्याने नाद सोडून दिला आणि ५ काय? कित्येक मंगळवार होतातच आहेत त्याचे सलग... !

आपण ज्या काही कृती करतो त्यात मला वाटतं ४ टप्पे असतात ( हा माझा अभ्यास नाही, कुठेसं ऐकल्याचं आठवतंय ते सांगायचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे इतकंच ! )

१. अजाणते अज्ञान - आपल्याला काय करायचंय हेच माहिती नसतं, मग ते करण्याचा प्रश्नच येत नाही !
२. सुजाण अज्ञान - आपल्याला काय करायचंय हे माहितेय पण कसं करायचंय हेच माहीती नाही !
३. सुजाण ज्ञान - आपल्याला काय करायचंय हे माहितेय आणि ते करताही येतंय, फक्त योग्य ती काळजी घेत जाणिवपुर्वक करावं लागतं.
४. अजाणते ज्ञान ! - आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय हे तर माहिती आहेच पण ते करकरून इतकी सवय झालीये की ते करताना वेगळ्याने करावं लागत नाही तर आपोआपच होत जातं !

ज्या कृतींकरता मी पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे, त्यांचे मी संकल्प केल्यास ते खरं आव्हान, जे पूर्ण करण्यात खरा कस लागेल परंतु जर मी आत्ताच त्या कृतीसाठी तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असेन तर मग मात्र ते मी माझंच केलेलं अवमूल्यन ठरेल असं मला वाटतं.

या पद्धतीने विचार केल्याने मला वाटतं या वर्षासाठीचा माझा संकल्प राहील - कार चालवायला शिकणे.