मीही या कार्यक्रमाला गेले होते. माझा अनुभवही छाया राजे यांच्या प्रमाणेच आहे. त्यामुळे त्यांच्या लेखाशी मी पूर्णपणे सहमत आहे. त्यांच्या लेखावर जकातदारांनी तोडलेले तारे पाहून एका मोठ्या आस्थापनेच्या कार्यकारी संचालकाने लेखातील एकही मुद्दा खोडून न काढता ज्या पद्धतीने आणि ज्या भाषेत पत्र लिहिले आहे ते पाहून त्यांची कीव करावीशी वाटली.  

जकातदारांनी दूरदर्शनवरील त्यांच्या कार्यक्रमात पूनम सहलीची खूप मोठी जाहिरात करून मोठमोठी आश्वासने दिली होती आणि त्यांना सुमारे ५००० रसिक श्रोत्यांचा सहभाग अपेक्षित होता. याचा अर्थ हा एक मोथा इव्हेंट आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. असे असूनही   'आम्ही इव्हेंट मॅनेजर नाही' असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरले तरी त्यांनी यासाठी एखाद्या इव्हेंट मॅनेजरची नेमणूक का केली नाही हे कळत नाही.

जकातदार म्हणतात "आमची कोणी, किती, कुठे व कशी अडवणूक करून आम्हाला त्या दिवशी संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत अडचणीत आणले होते त्याचे रडगाणे मी गाणार नाही" वास्तविक हे रडगाणे गाण्याची त्यांना सुवर्णसंधीच होती. त्यांना इतरांनी त्रास दिला असेलही, पण त्याची किंमत आम्ही का मोजावी?

जकातदार म्हणतात 'आमच्या बाजूने बोलल्यावर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला' पण त्यांच्या बाजूने म्हणजे "तिकिट काढून आलेल्या लोकांना बसायला आसनेच न ठेवून नंतर  मंचावरून त्यांच्या अंगावर खुर्च्या खाली टाकण्याचे जे सत्कृत्य आपण केले ते फार अभिनंदनीय आहे" असे कुणी बोलल्याचे आम्ही कुणीही ऐकले नाही, त्यावर टाळ्या पडण्याचा तर प्रश्नच नाही.

छाया राजेंच्या चेकच्या संदर्भातील विधाने तर निव्वळ हास्यस्पद! 'लेख छापून आल्यानंतर काय होते हे पहायचे.... म्हणून सावधपणे, धूर्तपणे चेक जमा केला नाही' असे ते म्हणतात. पण चेक जमा न करण्याचे हे आणि केवळ हेच एकमेव कारण असू शकते का? जोवर छाया राजे चेक जमा करत नाहीत तोवर जकातदारांचाच फायदा आहे हेही त्यांना कळत नाही तर मग त्यांना कळते तरी काय? या बाबतीतील बँकाच्या नियमांची माहिती त्यांना असण्याची अपेक्षा करणे महाचूकच ठरेल.

अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर ती स्टंटबाजी कशी होऊ शकते? जकातदार 'रडगाणे' गाण्याचे धाडस करू शकत नाहीत हा त्यांचा कमकुवतपणा. पण म्हणून इतरांनी केलेल्या धाडसाला उपरोधिकपणे हिणवणे योग्य आहे का? खरे पाहता जकातदारांनाच त्यांची अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध हाती मशाल घेण्याची गरज आहे असे वाटते

माधुरी