जी एंची बरीचशी खासगी मते , त्यांची जडणघडण समजून घ्यायला त्यांची पत्रे आणि "सोनपाऊले" सारखे संग्रह प्रचंड मदत करतात यात काही शंकाच नाही. पण काय कोणास ठाऊक , "सोनपाऊले" माझ्याच्याने जेमतेम एकदा कसेबसे वाचवले. चुनेकर आदी लोकानी प्रचंड मेहनत करून हे उत्खनन केले यात शंका नाही ; पण एका नवशिक्या लेखकाची धडपड याखेरीज पदरात काही पडत नाही असे मला ते वाचताना वाटले. "हिरवे रावे"पासून जी एनी जे लिहिले ते इतकी वर्षे समोर असून, इतक्या लोकानी त्याचा अर्थ लावलेला असूनही पुरते आकलनात आल्यासारखे वाटत नाही ! त्यामानाने त्यांचे सुरवातीचे लिखाण आता बरेच "शबल" वाटते...
द.भि. कुलकर्णी यानी जी एंवर बरेच लिखाण केले आहे. बऱ्याच जणाना (खुद्द जी ए ना) त्यांचे जीएविषयक विश्लेषण हुकलेले किंवा सरळसरळ अपमानास्पद वाटले आहे. मात्र त्यांचे एक मत मला तरी पटले. एके ठिकाणी ते म्हणतात की, जी ए हे एकूणच त्यांच्या आयुष्यात हक्काच्या, सख्ख्या कुटुंबीयांच्या प्रेमाला पारखे झालेले होते. अर्थातच या बाबतीत ते अगदी हळवे होते. त्यामुळे जिथे जिथे आई-वडील-बहीण यांच्या नात्याची चित्रणे येतात , तिथे त्याच्यातील नातेसंबंध इतके विलक्षण तीव्र , भावनातिरेकाने भरलेले दिसतात. या सर्व नात्यांबद्दल आपण (कदाचित इतके हळवे नसल्यामुळे) इतके पराकोटीचे भावनाप्रधान नसतो. कुलकर्णींचे या एका बाबतीतला विचार मला तरी पटलेला आहे.
बाकी पत्रांमधून काय किंवा कथांमधून काय , जी एंचे एकपदरी चित्र रेखाटणे कठीण वाटते. सुनीताबाई देशपांडे यानी आपल्या आत्मचरित्रात म्हण्टले ते मला परिणामकारक वाटले. "एका जी एंमध्ये अनेक जी ए वसतीला होते" अशा अर्थाचे ते वाक्य आहे ; आणि ते खरे आहे. ही हॅड् अ व्हेरी कॉंप्लेक्स पर्सोना.
मरणोत्तर प्रसिद्ध होत गेलेली त्यांची पत्रे म्हणजे एरवी सूर्यप्रकाशही कधी पोचला नव्हता अशा एखाद्या निबीड अरण्यातील वेगवेगळ्या प्रदेशांवर टाकलेले झोत असे मला नेहमी वाटत आले आहे. मात्र "होल इज ऑल्वेज बिगर दॅन द सम ऑव्ह इटस पार्टस्" या नियमाचा अचूक प्रत्यय आपल्याला ती वाचून झाल्यावर येतो.