पण हिच्यात तर एकाऐवजी दोन पीळ मारले आहेत की! मग ही मोबियसपट्टिका कशी? एकच पीळ असता तर मोबियसपट्टिका झाली असती. दोन पिळांमुळे मोबियसपट्टिकेचे कोणतेच खास आणि मनोरंजक गुणधर्म* हिच्यात असणार नाहीत. म्हणजे त्या एकाच पिळामुळे मोबियसपट्टिकेला कसा एकच पृष्ठभाग असतो, आणि त्या पृष्ठभागाला चिकटूनचिकटून फिरणारा (द्विमितीतला) प्राणी कसा चक्र पूर्ण झाल्यानंतर बाजूंची अदलाबदल होऊन आरशामागल्या प्रतिविश्वात गेल्याप्रमाणे होतो, तसं काही कविता वाचून भंजाळल्यासारखं, डोकं उलटं झाल्यासारखं वगैरे वाटलं नाही. (कदाचित दुसऱ्या पिळामुळे उलटं झालेल्याचं पुन्हा सुलटं झालं असू शकेल. एकच पीळ मारून सोडून दिलं असतंत तर कदाचित काहीतरी वाटण्याची शक्यता होती. दुसरा पीळ मारण्याची तसदी उगीचच घेतलीत.)

दुसरं म्हणजे, खऱ्या (एका पिळाच्या आणि त्यामुळे एकाच पृष्ठभागाच्या) मोबियसपट्टिकेत कवितेचा दुसरा अर्धा भाग 'ऍलिस थ्रू द लूकिंग ग्लास'मधल्या 'जॅबरवॉकी'सारखा उलट्या अक्षरात छापलेला असायला पाहिजे होता. किंवा, अर्ध्या कवितेनंतर अचानकपणे (ऍबरप्टली) उलट्या अक्षरात छापण्याऐवजी हळूहळू (ग्रॅज्युअली) अक्षरांचं संक्रमण सुलट्याकडून उलट्याकडे व्हायला पाहिजे होतं. तर हिला मोबियसपट्टिका म्हणता आलं असतं. पण इथे अर्थात दोन पीळ असल्यामुळे दोन पृष्ठभाग जसेच्या तसे (इंटॅक्ट) राहिले आहेत, त्यामुळे अर्थातच तसं होणार नाही.

*आणि कवितेचेही!