चित्रपटांचा आमच्या मनावर खोल परिणाम होतो, कारण आम्ही स्वतंत्र विचार करण्याची शक्तीच गमावली आहे. आणि आजचे बहुसंख्य हिंदी चित्रपट बघताना हेच जाणवते. चित्रपट म्हणजे मनोरंजन, मस्तपैकी नाच, गाणी.  रोज नवे स्टार सुपुत्र आणि सुपुत्री अभिनयाच्या नावाखाली कलेचे धिंडवडे काढत असतात. चित्रपटातील संवाद कसेबसे हिंदीतून बोलतात, पण प्रोमोची मुलाखत मात्र एकालाही हिंदीतून देता येत नाही. अशा परिस्थितीत आशयगर्भ वगैरे चित्रपट बघायची सवड आहे कुणाला? दिल तो पागल है साठी करिश्माला ऍवॉर्ड मिळू शकते यातच सर्वकाही आले. एखादा आमिर वेगळ्या विषयांवर चित्रपट काढत असतो, बाकी सर्व हॉलीवूडमधून काय चोरता येईल त्यावर लक्ष ठेवून असतात. त्यातही ज्यामध्ये मेहनत करावी लागेल असे चित्रपट आम्ही चोरायच्याही भानगडीत पडत नाही. चाकोरीच्या थोडेसुद्धा बाहेर जाणे आम्हाला पसंत नसते. अगदी रामूलासुद्धा शोलेच्या रिमेकशिवाय दुसरे काही सुचत नाही, तेव्हा इतरांच्या बौद्धिक दिवाळखोरीबद्दल काय बोलावे?

आमच्या मते बरेच काही सेन्सॉर करण्याची गरज आहे. आमचा समाज इतका संवेदनाशील आहे की लवंग पायाखाली आली तर सर्दी होणार्‍या राजकन्येची कथा खरी आहे असे वाटायला लागते. म्हणूनच पुतळ्यांमध्ये आमच्या भावना घट्ट गुंतलेल्या असतात. त्यांना जरा धक्का पोचला की आम्ही लगेच बशी जाळायला निघतो. आमच्या मते सेन्सॉर बोर्डाला लोकांनी काय बघावे, काय वाचावे, काय ऐकावे हे ठरवण्याचे सर्व हक्क देण्यात यावेत. किंबहुना भारताबाहेरील भारतीयांनीही सेन्सॉर बोर्डाला मंजूर नसलेले चित्रपट बघितले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भारतात फक्त हम आपके है कौन, कभी खुशी कभी गम सारखे कुटुंबवत्सल चित्रपट बनवायला परवानगी देण्यात यावी. किंबहुना करण जोहरसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकांना सरकारकडून खास सवलती देण्यात याव्यात. दिपा मेह्तासारख्या समाजकंटक दिग्दर्शकांवर आजन्म बंदी घालावी. तरच आपला समाज प्रगल्भ की काय म्हणतात तसा होउ शकेल.

हॅम्लेट