ऍटिट्यूड फक्त एखाद्या व्यक्तीची असते. आणि ती ती काही करण्याच्या बाबतीत दिसते असे वाटते. (तसे केले गेले असेलच असे नव्हे.) तिच्याकडे एक स्वभावविशेष म्हणून पाहिले जाते असे वाटते.
त्यामुळे ऍटिट्यूडला वृत्ती हा शब्द नेमका बसेल असे वाटते. वर सुचवलेल्या इतर शब्दांविषयी मला हे वाटते.
वर्तणूक, (बिहेव्हिअर, काँडक्ट?) नको ... वर्तणूक काहीतरी करण्यावरून दिसते, नक्की होते. ऍटिट्यूड आहे असे म्हणताना फक्त ती असण्याविषयीच विधान केले जाते. वर्तणुकीत काही तरी केले गेले आहे असे वाटते. शिवाय वर्तणुकीत तशी 'वृत्ती' असेलच असे नाही.
वागणूक, (ट्रीटमेंट?) नको ... वागणूक दुसऱ्याला दिली जाते. ऍटिट्यूड ही एखाद्याची स्वतःची असते.
प्रवृत्ती. (इन्स्टिंक्ट?) नको ... प्रवृत्ती ही एखाद्या प्रसंगी ... प्रतिक्रियात्मक स्वरूपात दिसते असे वाटते. प्रवृत्ती ही कृती करणाऱ्यात दिसत असली तरी तो गुणधर्म जास्तकरून प्रवृत्त व्यक्तीपेक्षा प्रवर्तकावर अवलंबून असतो असे वाटते. तसे केले गेले हे त्या व्यक्तीचा स्वभावविशेष असेल असे नाही.
कल.. = (ऍप्टिट्यूड, इन्क्लिनेशन?) नको ... कल फक्त "हे की ते?" असा विवेकाबद्दल प्रश्न असतानाच वापरला जातो.
विचारसरणी,. (थिंकिंग? स्कूल ऑफ थॉट?) ... नको विचारसरणी ही एखाद्या व्यक्तीची आहे असे ऐकायला योग्य वाटत नाही, ती एकंदर एखाद्या समूहाची, समाजाची असते. विचारसरणी ही फक्त असते. तिच्यात ती असणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख असतो असे वाटत नाही.
दृष्टिकोण. (पर्स्पेक्टिव्ह?) नको. दृष्टिकोण फक्त जगाकडे बघण्याचा, समजून घेण्याचा, विचार करण्याचा असतो असे वाटते. एखादे काम करण्याचा दृष्टीकोन हे बरे वाटत नाही.
हे माझे विचार कुठल्याही शास्त्रीय प्रमाणित संदर्भग्रंथाच्या अभ्यासातून आलेले नसून केवळ कल्पनाविलासातून आलेले आहेत. चू. भू. द्या. घ्या.