कृष्णसखी,
मुळे म्हणतात त्या कथेचा नायक दत्तक विधानासंदर्भात न्यायालयात साक्षीदार म्हणून जातो. माझ्या स्मृतीनुसार त्यातील काही भाग येथे उध्दृत करीत आहे.
1.नायक दिगंबर दंडवते.
2.साक्षीदार म्हणून जायचे आहे, असे कळताच तो झटकन आंघोळ उरकून घेतो. आंघोळीचे वर्णन करताना मिरासदारांच्या ओळीचा आशय असा : दिगंबरने इतक्या झटकन पोह-याने पाणी घेतले की काय होत आहे, हे क्षणभर पोह-यालाही कळले नाही. त्याने भराभरा पाणी अंगावर घेतले. त्यातही त्याने दंड चोळण्याची शिताफी दाखवली.
3.न्यायालयात देशपांडे वकील एका नात्याबाबत दंडवतेला विचारतात, "हे बरंच लांबचं नातं झालं नाही का ?"
दिगंबर उत्तरतो,"पण माणसं मायाळू आहेत."
एका संदर्भात दिगंबरकडून 'बेंड' असा उल्लेख होतो. (बेंड म्हणजे माझ्या माहितीनुसार कंबरेखाली होणारा विकार). त्यावेळी न्यायालयात हशा पिकतो. मिरासदारांच्या ओळींचा आशय असा : खुद्द कोर्टही मिशीतल्या मिशीत हसल्यासारखे वाटले. तोंडात पानाची गुळणी धरून बसलेल्या एका वकिलालाही हसू येऊन त्याचा शर्ट लाल होतो.
देशपांडे वकील साक्षीदाराकडून उत्तरे काढून घेण्यात तरबेज असतात. पण दिगंबरच्या मासलेवाईक उत्तरांमुळे ते निरूत्तर होऊन खाली बसतात.
4.स्मृतीप्रमाणे, दिगंबर बहुतेक 'व्यावसायिक' साक्षीदार असतो.
चुकीचे असल्यास कृपया सांगावे.
---
'मांजर व्हा' मध्ये मांजराचे रूप मिळाल्यावर पूर्ण होऊ शकणा-या कारकुनाच्या मनोराज्यांचे गालातल्या गालात हसू येईल, असे चित्रण मंत्रींनी केले आहे. कारकुनाच्या त्या मनोराज्यांपैकी एक : मांजर झाल्यावर ऒफिसमध्ये लाडाने जवळ येणा-या शोभा राजेचे हात चाटता येतील.
माझा विषय फ्रेंच होता. पण मराठीच्या आवडीमुळे मी मराठी विषय घेतलेल्या मित्राकडून पुस्तक वाचायला घेऊन त्याची पारायणे केली होती.
मुळे, आपण उपस्थित केलेल्या विषयामुळे स्मृतींना उजाळा मिळाला.