त्यामुळे आपण कांही करू शकत नाही. हा समूह कायदा (मॉब रूल) आहे. न्यायालयाला पण सवाई गंधर्व समारोह ध्वनिप्रदूषक व नवरात्रीउत्सव संस्कृतिरक्षक वाटतो. त्यामुळे आपण सनदशीर मार्गाने कांही करू शकत नाही. एकदा मी असाच उपद्रवी उत्सव केवळ मनगटाच्या बळावर बंद केला होता. तेव्हा आमचे ती. आजारी असल्यामुळे मी तसे केले. परंतु नंतर मी तसा प्रयत्न केला नाही. प्रतिपक्षही तेव्हढ्याच तयारीत असणार आणि रोज रोज आपला दिवस नसतो. जर शांतताप्रेमी संघटित झाले आणि त्यांनी जर दहशत निर्माण केली तरच हे शक्य होईल. समाजातील कुंपणावरचे लोक मग प्रबल पक्षांत सामील होतील. राजकीय पक्ष देखील प्रबलालाच पाठींबा देतील. दुर्बळाला कुणीही विचारत नसतो. सध्या घर साउंडप्रुफ करून घेणे हे इष्ट. एक गंमत सांगण्यासारखी आहे. मी गणेशविसर्जनाच्या दिवशी दारेखिडक्या लवून वाचत बसलो असतांना आमची एक शीख शेजारीण मला चिडविण्यासाठी मुद्दाम बेल वाजवून दार उघडायला लावत असे व "एक दिन तो ढोल की आवाज सुनिये भाईसाब. आप पढते है तो मेरा सर दुखता है" असे म्हणत असे. अर्थात मीदेखील "इसकी कीमत है बहेनजी कुछ खाने की चीज. कुछ खिलाइये तो सही" असे म्हणत असे.

दुसरी गोष्ट आपल्या कोणत्याही देवळात जा. रोज संध्याकाळी आरतीचा गोंगाट चालतो. त्याची तीव्रता देवळाच्या प्रवेश्दारी ६०-७० डेसिबेल असायला हरकत नाही. मशिदीवरील कर्ण्यावर दिली जाणारी बांग आपल्याला ठाऊक आहेच. सुदैवाने अजूनतरी ख्रिश्चनांनी तरी निदान मुंबईत गोंगाट करण्याची युक्ती शोधून काढली नाही. कार्निव्हल हा होळीसारखा आहे असे ऐकून/वाचून आहे.