परवाच एका डॉक्टर कडे जाण्याचा (योग ??!! ... नव्हे नव्हे!) प्रसंग आला... गेली ४-५ वर्षे दर३-४ महिन्यांनी तेथे दमा या विकाराच्या इलाजासाठी जावे लागते  ही भरमसाठ  गर्दी ... दवाखाना म्हणजे जणू छोटे साम्राज्यच ... साम्राज्याचे अधिपती म्हणजे हे डॉक्टर...  सकाळी फक्त ३ तास (पैसे घेउन!) दर्शन देणार...दर्शनापुर्वी अधिपतींच्या सेवकांकडे आगाउ दुरध्वनीवर नोंदणी हा प्रकार नाही... म्हणून सक्काळी जाउन जागा पकडून प्रत्यक्ष नाव द्यावे लागणार... डॉक्टर येई पर्यंत दवाखानाभर चक्कर टाकली असता जुन्या डॉक्टरकीच्या प्रमाण पत्रांच्या रांगच रांग दिसली... फर्राटेदार फाँट मध्ये समोरच्याला जणू वाचताच येउ नये अशी प्रमाण पत्रे...  ठीक्ठीकाणी "शॉर्ट फॉर्मचा" सढळ हाताने वापर... एम.बी.बी.एस वगळता सगळेच शॉर्ट फॉर्म अस्मादिकांच्या शॉर्ट बुद्धीच्या बाहेरचे... धक्का दायक प्रकार म्हणजे डॉक्टरकी सुरू करण्याचा परवाना हा काही दिवसांपुरता असतो असा अंदाज एक प्रमाणपत्र पाहून आला...व ठराविक काळानंतर त्याचे नुतनी करण आवश्यक आसते का?? म्हणजे काही परीक्षा द्यावी लागते का डॉक्टर साहेबांना???... नक्की काय ते माहिती नाही...

तर अशा या अधिपतींचा राजवाडा दरबाराच्या वरच बांधला होता... दरबारात खुप रोगी जनतेची गर्दी जमली होती...आणी डॉक्टर साहेब आले... (वेळेवर बरं का...!)

आमचा नंबर जागा पकडल्यामुळे लौकरच होता. आत बोलावल्यावर होणार्या त्रासाची काही सेकंदातच माहिती घेतली गेली. आणि बरोबर नेलेली त्यांच्याच दरबाराच्या वाऱ्या केल्यामुळे  (जाड जुड!) झालेली फाइल चाळली गेली... अंगाला हातही न लावता तोंडी तपासणी झाली... कारण आम्ही रेग्युलर कस्टमर ना !... मग ते म्हणाले,, दिड वर्ष झालंय "ही" चाचणी करुन चला आज पुन्हा करुयात ! आणि मग रवानगी त्यांच्याच लेबॉरेटॉरीमध्ये... त्यांच्या हाताखालील डॉक्टरांनी (डॉक्टर नव्हता बहुतेक तो ! ) "ती" चाचणी घेतली. आणि रिपोर्ट दुपारी मिळेल असं सांगितलं.

दहा मिनिटात पेशंट बाहेर

आहा... अस्सं बरं बाहेर येउ देतील हाती आलेल्या पेशंटला?? गुहेत आलेल्याला सुखरुप कसं सोडणार बरं "कापल्या"शिवाय????

१५०रुपये (पुनः)तपासणी फीस आणि ३५०/- चाचणी फीस.

१०मिनिटं=रु.५००

जवळ जवळ सर्वांसाठी हाच "रेट"... मला,, आणि त्याच बरोबर धोतर आणि अनवाणी आलेल्या अशक्त खेडुताला जो बिचारा खोकत खोकत निमुट पणे डॉक्टरांचे "देणे" देउन चालता झाला........बाजुच्याच दुकानातून (महागडया !) औषधांची चळत घेण्यासाठी :( 

माझे त्या औषध विक्रेत्याला असलेले "देणे" रिपोर्ट येइ पर्यंत टळले होते !