आवली जशी कर्कशा वगैरे रंगविली गेली आहे, तशी ती का झाली ह्याचे तसे उत्तर तसे फारसे कठीण असेल असे वाटत नाही. तत्कालीन प्रथेनुसार तिचे लग्न होऊन ती सासरी आली तेव्हा ती नुकतीच वयात येत होती. अशा वेळी तिचा नवरा संसारातून लक्ष काढून अध्यात्माकडे वळला. आवली कितीही प्रगल्भ असती तरी हे पचवणे कठीणच होते. व सर्वात वाईट हे की ते भागधेय तिला भोगावेच लागत होते, तिची इच्छा असो, वा नसो. कारण शतकांनू शतके भारतीय नारी सर्वस्वी आपल्या पतिवर जगण्यासाठी अवलंबून. आणि हे तर आपल्या संस्कृतिने इतके अंगी बाणवलेले, की त्यामुळे ह्या स्त्रीच्या दुःखी जीवनाकडे निरखून बघावे असे कुठल्याही अभ्यासकाला वाटले नसावे. तसेच तत्कालीन जी काही माहिती इतिहासाच्या अथवा समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपलब्ध आहे, ती खूपच त्रोटक असण्याची शक्यता जास्त.

खरे तर कुठल्याही क्षेत्रात स्वतःच्या असीम कर्तृत्वाने उच्चपदावर पोहोचलेल्या व्यक्तिंच्या सहचरांना कायकाय दिव्ये पार करावी लागली असतील, कायकाय भोगावे लागले असेल, हा तपासून पाहण्याचा विषय आहे. मग ह्या उच्चपदी पोहोचलेल्यात सर्वच क्षेत्रातील लोक आले-- तुकारामांसारखे वंदनीय संत, फुले-आंबेडकरांसारखे समाजप्रबोधनाने झपाटून गेलेल्या व्यक्ति, पु. लं. सारखे ज्येष्ठ चतुरस्त्र इ. (ही काही नावे इथे मी केवळ उदारणार्थ दिलेली आहेत). पण ह्याबाबतीत संशोधनाची जरूरी आहे, कल्पनाविलासातून 'आजपर्यंत जे वाचले ऐकले होते त्यापेक्षा काय वेगळे आहे' हे कसे पाहता येईल? ...'आवलीला जाणून घेण्यासाठी, तिचं तुकारामांच्या जीवनातलं अस्तित्व समजून घेण्यासाठी प्रत्येकानं जरूर वाचावी अशीच ही कादंबरी आहे' हे फारसे पटणारे नाही.

आवलीच्या बाबतीत काही फारसे संदर्भ उपलब्ध नसावेत, पण अलिकडे (म्हणजे १९ व्या व २० व्या शतकात) होऊन गेलेल्या अशा अनेक व्यक्तिंच्या विषयी बरीच माहिती उपलब्ध असावी. तरी युरोपियन समाजात ज्या प्रमाणे खोलात जाऊन माहिती करून घेऊन त्याबद्दल सविस्तर निबंध (किंवा पुस्तके) लिहीली जातात, तसे आपल्याकडे होत नाही. ह्यामुळे मग आपण असे कल्पनाविलासातच दंग होऊन भावविव्हल कादंबऱ्यात आनंद मानतो की काय?

जाता जाताः मर्ढेकर व तुकाराम ह्यांच्या साहित्याचे एक गाढे अभ्यासक प्रा. म. वा. धोंड ह्याचे अलिकडेच निधन झाले. त्यानंतर त्यांच्याविषयी 'उपक्रमा'वर एक चर्चा झाली. तिथे मी जे लिहीले आहे, ते इथे तसेच्या तसे उर्धृत करतो, कारण तुकारामांचे सदेह वैकुंठी जाणे ह्याविषयी त्यावर काही टिप्पणी आहे:

'तुकारामाचे निर्याण' ह्या शीर्षकाचा लेख धोंडांनी ह्या वर्षीच्या दीपावलीच्या दिवाळी अंकात लिहीला आहे. गेल्या चार वर्षात त्यांनी तुकारामासंबंधी काही संशोधन केले, व ते तीन लेखांतून आपल्यासमोर मांडले. सदर लेख हा त्यांपैकी तिसरा (व आता असे म्हटले पाहिजे की शेवटचा).

ह्यात धोंड तुकारामाच्या निर्वाणाबद्दल काही वेगळेच अनुमान आपल्यासमोर ठेवतात. मला स्वतःला ह्याबाबत काहीच खोल माहिती नाही. धोंडानी जे त्यांच्या लेखात लिहीले आहे त्याचा गोषबवारा इथे मी लिहीतो:

ते म्हणतात की तुकाराम सदेह वैंकुंठात विमानात बसून गेले, ही त्यांच्या वारसांनी पसरवलेली निव्वळ भाकडकथा आहे. तसेच ह्या लेखात धोंडानी अजून एका 'लॉबी'च्या [माझा शब्द, त्यांनी त्यांना 'ब्राम्हणेतर चळवळीचे प्रचारक' असे उद्बबोधले आहे] थियरीचाही परामर्ष घेतलेला आहे. ह्या लोकांच्या मते गावातल्या ब्राम्हण मंडळीने तुकारामांना जंगलात नेऊन त्यांचा खून केला.

धोंडांच्या निष्कर्षानुसार झाले असे की तुकारामांना आचरणातला जो आदर्श अभिप्रेत होता (मनाच्या व्यवहारातील शिस्त वगैरे) त्याच्या बरोब्बर उलट त्यांचा भाऊ कान्होबा, त्यांची दुसरी पत्नि, जिजाऊ व त्यांच्या स्वतःचा पुत्र वागत होते. ह्याचा त्यांना उबग आला. तसेच कीर्तन वगैरे करून ते जे समाजप्रबोधन करत होते, त्यात गावातील विघ्नसंतोषी लोकांनी खोडे घालण्यास सुरूवात केली. कीर्तन चालू असता उगाच 'परचक्र आले आहे' अशी बातमी तेथे पाठवून ते उधळून लावणे, कीर्तनाच्या मंडपाला आग लावणे इत्यादी प्रकार होऊ लागले होते. तेव्हा तुकोबांनी त्यांच्या काही निवडक अनुयायांबरोबर पंढरपुरी जायचे ठरवले. ते जातांना गरुडासदृश्य पालखीतून् गेले (हेच ते 'विमान' होय !). पंढरपुरी पोहोचल्यावर त्यांनी विठोबामाउलीचे पाय धरले. त्या रात्री इतर मंडळी भोजनाची व्यवस्था करण्यात गुंगली असताना त्यांनी भिकार्‍याचा वेश परिधान केला, व सर्वांचा डोळा चुकवून ते तेथून निघून गेले. ते परागंदा झाले, त्यानंतर ते कुणासच कधीही दिसले नाहीत, ना त्यांचे शव कुणाला सापडले. धोंडांच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व त्यांच्या वारसांना लाजिरवाणे होते, म्हणून त्यांनी ती 'विमानात बसून निर्वाण' केल्याची 'भाकड'कथा रचली.

लेखात धोंड तुकारामच्या अनेक अभंगाचे सविस्तर दाखले देतात. अत्यंत वाचनीय असा हा लेख आहे.

टीपः  त्यांच्या लेखात धोंडांनी तुकारामांच्या दुसऱ्या पत्निला अनेकदा 'जिजाऊ' असे संबोधले आहे, मला वाटते ती त्यांची गफलत झाली असावी. तुकारामांची पहिली पत्नी जिजाऊ व दुसरी आवली. पण हा तसा त्या लेखाच्या संदर्भात गौण मुद्दा आहे.