मला असे म्हणायचे होते की... फक्तच भ्रष्टाचार जगासमोर का आणावा या वाहिन्यांनी? डॉन लोकांच्या  मुलाखती, क्रिकेटपटूंच्या आणि अभिनेत्रींच्या जोड्या लावत बसण्यापेक्षा कुठेतरी एखादा शिक्षक चांगले अभिनव कार्य करत असेल तर तेही दाखवायला हवे.

असा विचार करा... ह्या वाहिन्यांना पैसा कुठुन मिळतो? जाहिरातदारांकडून. म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातदारच ठरवतात की काय दाखविले जाईल आणि काय नाही. आता हे जाहिरातदार काय फासे टाकून ठरवत नाहीत. जे लोक जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करतात, ते काही अभ्यास केल्याशिवाय तसे करतील का? मुळीच नाही. जाहिरात निर्मितीबरोबरच हे जाहिरातदार ह्या जाहिराती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोचतील ह्याचाही विचार करतात. आता, जाहिराती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय करायला लागेल? अर्थात, जास्तीत जास्त लोकांना आवडणारे कार्यक्रम दाखवावे लागतील. ज्याअर्थी भ्रष्टाचार उघडकीला आणणारे कार्यक्रम जास्तीत जास्त दाखवले जातात त्याअर्थी तेच लोकांना बघायला आवडत असणार असा तर्क केला तर तो काही चुकीचा ठरणार नाही. पण समजा जाहिरातदारांचा अभ्यास (सर्व्हे, मार्केट ऍनॅलिसिस) चुकीचा आहे. तर? जर तसे असेल तर हळूहळू लोक हे कार्यक्रम पाहणे बंद करतील आणि मग जाहिरातदारांचे डोळे उघडतील. तुम्हाला जर असे कार्यक्रम आवडत नसतील तर पाहू नका. वाहिन्यांशी पत्रव्यवहार करून त्यांना तुम्हाला कोणते कार्यक्रम आवडतात ते कळवा. जर तुमच्यासारखेच बहुसंख्य दर्शकांचे मत असेल तर तुम्हाला बदल घडून आलेला दिसून येईल. पण जर तुम्ही अल्पसंख्य असाल तर काही उपाय नाही.