गुजरात मध्ये दारूबंदी आहे, म्हणून लोक दारू प्यायचे थांबलेत का?
लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे, पण किती लोक हे नियम पाळतात?
जनतेची नितीमत्ता सुधारायचा सरकार प्रयत्न करू शकते पण जबरदस्ती करून हे होणार नाही, लोकांना जोपर्यंत नियम पाळण्यातील फायदे कळत नाहीत तोपर्यंत नियम कागदोपत्रीच राहतील.
समाजात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंबच चित्रपटात आणि नाटकात दिसते, अर्थात, त्यात थोडी नाट्यमयता आणि अतिरेक असतो, पण विषयाचा गाभा असतोच.
कालच वाचले की केंद्रीय मंत्र्यांनी बॉलीवूडला "सिगरेटचा वापर" कमी करण्याची सूचना केली आहे. सिनेमात "हिरो-हिरोइन" सिगरेटचे झुरके घेताना बघून तरूणांना सिगरेटबद्दल आकर्षण निर्माण होत असेल, पण म्हणून सिनेमातल्या सिगरेट पिणाऱ्यांवरच सगळा दोष ढकलणे बरोबर आहे का? भारतात गल्लोगल्ली कुठेही केव्हाही विडी-सिगरेट उपलब्ध आहे. पानवाल्याच्या दुकानातून शाळकरी पोरसुद्धा सिगरेट विकत घेउ शकते, हा दोष काय बॉलीवूडचा नाहीये.
सेन्सॉर बोर्डावर किती जबाबदारी टाकायची? आणि समजा तशी जबाबदारी टाकली तर तिचा दुरुपयोगही होऊ शकतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या चित्रपटात मांडलेल्या राजकीय विचारांशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य सहमत नसतील, आणि त्यांनी "समाजस्वास्थ्याला धोकादायक" असे कारण देऊन असा चित्रपट दाखवायला परवानगी नाकारली तर?