१. ब्लॉग बनवणे अगदी सोपे आहे. वर्डप्रेस.कॉम, ब्लॉगस्पॉट.कॉम, क्लियरब्लॉग्स.कॉम, लाइव्हजर्नल.कॉम आणि इतर अनेक संकेतस्थळांवर जाऊन तुम्ही आपला ब्लॉग काही मिनिटात सुरू करू शकता, अगदी पूर्णपणे मोफत!
२. आंतरजालावर अर्थार्जन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एक संकेत स्थळ (किंवा ब्लॉगही) तयार करून तिथे जास्तीत जास्त वाचक कसे भेट देतील ते पाहावे. यासाठी तुमचा ब्लॉग सुप्रसिद्ध व्हायला हवा. कसा ते नंतर बघू. एकदा का तुमचा ब्लॉग सुप्रसिद्ध झाला, की तुम्ही गूगल किंवा तत्सम जाहिरात पुरवणाऱ्या एखाद्या संस्थेच्या जाहिराती तुमच्या ब्लॉगवर डकवायच्या. गूगल ची जाहिरात सेवा तुमच्या ब्लॉगच्या विषयानुरुप जाहिराती आपोआप तुमच्या ब्लॉगवर दाखवील. तुमच्या ब्लॉगला भेट देणारे लोक जेव्हा ह्या जाहिरातींवर टिचकी मारतील तेव्हा तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल. जितके अधिक लोक तुमच्या ब्लॉगला भेट देतील, तितक्या अधिक टिचक्या, जितक्या अधिक टिचक्या तितके तुमचे उत्पन्न अधिक.
३. तत्त्वतः तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील मजकुराचे(च्या) मालक(कीण) आहात. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे फार कठीण.
आता तुमचा ब्लॉग सुप्रसिद्ध कसा करायचा आणि तुमच्या ब्लॉगकडे अधिकाधिक लोक कसे वळतील हे बघू. ह्या साठी प्रथम तुम्हाला एखादा मनोरंजक, उपयुक्त विषय निवडावा लागेल. मग आंतरजालावर शोध करून ह्याच विषयावर इतर लोक जर काही ब्लॉग लिहीत असतील तर तिकडे जाऊन त्यांच्या ब्लॉगवर टिप्पणी करून तिथे तुमच्या ब्लॉगचा दुवाही द्यावा. हळूहळू लोक तुमच्या ब्लॉगकडेही वळतील. जर तुमच्या ब्लॉगवर उपयुक्त, मनोरंजक माहिती असेल, तर हे लोक त्यांच्या ब्लॉगवर तुमच्या ब्लॉगबद्दल लिहितील. मग अधिक लोक तुमच्या ब्लॉगकडे वळतील. म्हणता म्हणता तुमच्या ब्लॉगची ख्याती वाढेल आणि लोक तुमच्या ब्लॉगला नियमित भेट देऊ लागतील. आंतरजालावरच्या प्रवाशांचा असा ओघ जर तुम्हाला सतत चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला सातत्याने तुमच्या ब्लॉगवर काहीतरी नवीन आणि रुचकर मजकूर टाकावा लागेल. दररोज आणि नियमित असा मजकूर ब्लॉगवर टाकणे कठीण आहे. पण ह्यावरही उपाय आहे. तुम्ही तुमच्या समविचारी मित्रमैत्रिणींचा एखादा गट तयार करून एकाच ब्लॉगवर लिहू शकता. तशा सोयी बहुतेक ब्लॉगसेवांमध्ये उपलब्ध असतात. तुमच्या ब्लॉगवर नियमित लेखन करण्याबरोबरच तुम्हाला सतत तुमच्या विषयाशी संबंधीत असलेल्या इतर ब्लॉगांना भेटी देऊन तिथे टिकाटिप्पणी करणेही तितकेच आवश्यक आहे.
तुमच्या ब्लॉगसफरीसाठी शुभेच्छा!