वर दिलेली माहिती प्रदीप ह्यांनी म्हटल्याप्रमाणे उपयुक्त आहे.



आयफ्लेक्सचे दीपक घैसास ह्यांचे मतही वाचावे:


भूमिपुत्र विरुध्द उपरे


(दीपक घैसास,सीईओ, आय-फ्लेस इंडिया )
अन्नातील वाटेकरी आणि भूमीवरील भार वाढला की संघर्ष होतोच; हे झालं सनातन सत्य. त्यात राजकारण आले, की संघर्ष "उभा' केला जातो. मुंबईत गेल्या आठवड्यात झडलेला संघर्ष राजकारणापलीकडे जाऊन शांत डोक्‍याने तपासल्यास अनेक उत्तरे सापडतील.
व्यवसायाच्या निमित्ताने सतत हिंडताना आज ठळकपणे जाणवते काय, तर नव्या संधींच्या, उज्ज्वल भविष्याच्या शोधात केलेले स्थलांतर. युरोपचे उदाहरण घेऊ या. जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यावर पोलंड, चेचेन्या, जॉर्जिया, हंगेरी अशा देशांतील मंडळी संधीच्या शोधात निघाली. आज बाल्कन देशांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. जर्मनीत टर्की मंडळी मोठ्या प्रमाणात पोचली आहेत. लंडनच्या जवळपास प्रत्येक दुकानात रशियन वंशाची नोकर मंडळी आहेत. घराघरांत कामाला येणाऱ्या बायकाही स्थलांतरित. यजमानबाईची आणि कामवालीची भाषा वेगळी; पण ती आता अपरिहार्यता ठरली आहे. शिवाय या वंशभेदामुळे व्यवहार अडत नाहीत; अडून भागायचेही नाही. आयटीसारखे क्षेत्र असो, धनिक-वणिकांची दुकाने असोत किंवा घरकामगार; स्थलांतरित सर्वत्र आहेतच. अमेरिकेत कित्येक शतकांपासून हे असेच चालत आले आहे.

स्थलांतरित अर्थव्यवहाराचा डोलारा सांभाळतात, किंबहुना कार्यक्षम लोकसंख्या याच गटाची असते. क्‍यूबा, मेक्‍सिकोतील हजारो लोक अमेरिकेत जातात. झिम्बाब्वे, झांबियातील मंडळी दक्षिण आफ्रिकेत पोचली आहेत. शिवाय हे काही आजचे चित्र नाही.

जगाच्या इतिहासाची पाने चाळून पाहिली तर स्थलांतर हा मानवी स्वभाव असल्याचे दिसेल. आर्यदेखील तसे बाहेरचेच. आर्टिक होम इन वेदाजमध्ये लोकमान्य टिळकांनी याबाबत स्पष्ट लिहिले आहे. भारतीयही व्यापारउदिमासाठी फिरत राहिले. कधी कामगार म्हणून त्यांना गुलामासारखे हलवले गेले, तर पूर्व आफ्रिकेत व्यवसायासाठी भारतीय पोचले. दक्षिण आफ्रिकेच्या एका दौऱ्यात तर काळे आणि गोरे यांच्यात तेथील भारतीयांनी मध्यस्थाची भूमिका केल्याने काही वेळा वर्णद्वेष बोथट होऊ शकला. गोऱ्या आणि काळ्या कातडीचा मिलाफ असलेली भारतीय मंडळी मध्यस्थ म्हणून योग्य होती, असे तेथील लोक सांगतात. इंडोनेशिया ही डचांची वसाहत होती. रशियन भाषेत साखर हा शब्द गोडासाठी वापरला जातो. ग्रीसमध्ये मराठी नावाचे बेट आहे असे सांगतात. इस्तंबूल ते उत्तर भारतापर्यंत कुठेही जेवणात नानसारखा एकच पदार्थ कुलचा किंवा पराठा अशा तत्सम नावाने ओळखला जातो, तो स्थलांतरितांनी त्यांच्या प्रवासात अशाच प्रकारचा पदार्थ कुठून कुठेतरी नेल्यामुळेच.

संपूर्ण जगाने स्थलांतराचा अनुभव घेतला आहे, याचीच ही उदाहरणे. जाणारा प्रवासात संस्कृती वाहून नेतो अन्‌ मग त्यातून जग नावाची एक एकजिनसी कल्पना अस्तित्वात येते.

अंटार्क्‍टिका ओलांडून लोक आले आणि गेलेही. ऑस्ट्रेलिया हा इंग्लंडमधून तडीपार केलेल्यांचा देश म्हणून ओळखला जायचा. आजही कधीतरी गमतीने तसे उल्लेख केले जातात. जागतिकीकरणाने स्थलांतराची प्रक्रिया गतिमान केली हेही खरे; पण अगदी पूर्वापारपासून स्थलांतर चालतेच. न्यूयॉर्क असो, कॅलिफोर्निया असो किंवा अगदी आपले कोलकता- या प्रत्येक ठिकाणी चायनाटाऊन या नावाने ओळखली जाणारी वसाहत आहे. भारतीय संस्कृतीने समुद्रप्रवास निषिद्ध मानला होता. म्हणून कदाचित भारतीय उशिरा बाहेर पडले असतील; पण मॉरिशस, ओमान, युगांडा अशा कित्येक देशांत आपली मंडळी गेलीच.

कित्येक वर्षे स्थलांतरे सुरू असताना आता त्याबद्दल जे विरोधी स्वर उमटतात, त्याचे खरे तर दोन स्तर असतात. एक तर प्रत्येक ठिकाणच्या भूमिपुत्रांना येणाऱ्यांमुळे नोकरी गमवावी लागते, संधींवर ताण पडतो, आणि दुसरे म्हणजे, आलेले लोक तेथील मातीशी फटकून वागण्यात धन्यता मानतात. दोन्हीही प्रश्‍न अर्थातच महत्त्वाचे असतात. बोचकी बांधून आणि वळकटी घेऊन मंडळी येतात, ती त्यांच्या प्रदेशात समस्या असतात म्हणून. अर्थात स्थलांतर जितके सनातन तितकाच स्थलांतरितांना होणारा विरोधही. आज अत्यंत संपन्न मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतही स्थानमाहात्म्य वाढते आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ऑफ शोअरिंगवर भर आल्याने काही सिनेटर्स विरोधातल्या सुधारणा मांडण्याचा आग्रह धरतातच. पण आता आमच्याकडून कर्ज घ्या, कारण आम्ही त्यासंबंधीची प्रक्रिया परदेशात न करता अमेरिकेतच करतो, अशा जाहिराती बॅंकाही देऊ लागल्या आहेत. तेलाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आखातात अनेक देशांतले लोक पोचले. आता या लोकांनाही विरोध होऊ लागला आहे. ओमान आणि कुवेत हे दोन्ही देश तसे संपन्न; पण आता तेथेही भूमिपुत्र बाहेरच्यांना नोकऱ्या देऊ नका, अशी आंदोलने करीत आहेत. सौदी अरेबियातील स्थानिकांची चळवळ सौदीआयझेशन या नावाने ओळखली जाते आहे. दक्षिण आफ्रिकेत काळ्यांना रोजगारात अमुक प्रमाणात संधी द्या, अशा मागण्या सुरू झाल्या आहेत.

बाहेरच्यांच्या येण्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण येतो. त्यामुळे भडकलेली माथी आंदोलने करतात. या विरोधामागची कारणेही बहुतांश ठिकाणी बाहेरून आलेले समजून घेतात. तेथील मंडळींमधला एक होऊन जाणे, हा आंदोलने बोथट करण्याचा भाग असतो. जिथे पैसा कमवायला जातो आहोत, तेथे गोंधळ घालायचा नाही. स्पॉयलर कम्युनिटी व्हायचे नाही, हा सर्वांत महत्त्वाचा मूलमंत्र. अमेरिकेतले भारतीयही उगाच मुळाचा बाऊ न करता "बाय द वे वुई आर इंडियन,' असे म्हणतात, तेव्हाच ते तिकडचे झालेले असतात हे समजते. जेथे गेला आहात तेथील संस्कृतीचे तुम्ही वाहक झाला आहात काय, हा यातला कळीचा मुद्दा. आज जागतिकीकरणाने संधींचे नवे दरवाजे खुले केले आहेत. मूळ भूमीत संधी नव्हती, म्हणून केरळी परदेशात गेले. आता त्यांनी आखातातून पाठवलेल्या पैशांमुळे केरळचे चित्र बदलते आहे. उद्या कदाचित तेथील स्थलांतर संपेलही. अमेरिकेतले सियाटेल हा काही दुधामधाचा संपन्न परगणा नाही; पण तेथे बोइंग, मायक्रोसॉफ्टसारखे उद्योग पोचले आणि परिसराचा कायापालट झाला. आज जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात तंत्रज्ञानाने उभारलेल्या पुलावरून टेक्‍नॉलॉजी ट्रान्स्फर होते आहे. एखाद्या प्रदेशाचा विकास योग्य प्रकारे झाला, तर तेथील लोक बाहेर पडणार नाहीत. रोजगाराच्या संधी गावागावात उपलब्ध होतील. अमेरिकेतील मिडवेस्ट किंवा साऊथवेस्टची मंडळी न्यूयॉर्कला क्‍वचित कधीतरी पर्यटनासाठी जातात. त्यांना एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या महानगरात जावे लागत नाही. समतोल विकास हेच प्रत्येक समस्येवरचे उत्तर आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असेल तर त्या तिळाचा, म्हणजेच संधींचा आकार मोठा करायला हवा. कोणत्याही लोकशाहीत अमुक प्रदेशासाठी प्रवेश परवाना सक्‍तीचा होऊ शकत नाही. अशी बंधने केवळ चीन -रशियासारख्या साम्यवादी देशात लागू होतात. स्थलांतरे शक
्‍य तितकी कमी करण्यासाठी सर्वांगीण विकास हा एकमेव मार्ग आहे. तो चोखाळताना जे कामाच्या शोधात नवे प्रांत आक्रमतात त्यांनी त्या ठिकाणचेच होऊन राहणे, हा तात्कालिक उपाय आहे. तो कटाक्षाने अंगीकारला गेला तर राडे थांबतील.

स्ट्रायकर
स्थलांतर थांबवायचे असेल तर...
१. प्रदेशाचा विकास योग्य प्रकारे हवा.
२. असमतोल कमी करत आणायला हवा.
३. रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात.
४. तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग हवा.



मूळ बातमी इथे