भाषेतल्या गमतीजमती सांगणं एवढाच या लिखाणाचा उद्देश आहे.
हे पटले.

हिंदी आणि मराठीत बरेच शब्द सारखे आहेत, पण वेगवेगळ्या अर्थाचे. त्यामुळे काही वेळा गफलत होते.

विदर्भात 'खाली' अगदी सर्रास वापरतात. मराठीतही 'खाली'चा एक अर्थ 'रिकामा', 'रिता' असा शब्दकोशात दिला  आहे. 'परेशान', 'मजबुरी' सारखे असंख्य शब्द विदर्भात वापरले (विदर्भात वापरल्या) जातात. आवाज देणे ही आम असले तरी विदर्भातले हाक घालतातही आणि मारतातही. प्र. न. जोशींचा आदर्श मराठी शब्दकोश असो वा मोल्झवर्थचा, सर्व शब्दकोशांत 'खाली', 'परेशान', 'मजबुरी'सारखे असंख्य शब्द आहेत. माझ्या मते असे शब्द वापरायला हवेत. जसे 'खिजमत', 'तनखा', 'तकलीफ', 'तलाश', 'तलखी', 'निहायत' (न्याहरी हा शब्द फारशीच आहे), 'गरूर', 'गर्दिश'  (गर्दी सर्वांना माहीत आहेच), 'गर्दन', 'नसिहत', 'नसल','नजाकत', 'नज वगैरे. 

एक गंमत: उर्दूत ज्योतिष म्हणजे नजूम आणि ज्योतिषी म्हणजे नजूमी. मराठीत हे दोन्ही शब्द अस्तित्वात आहेत. मराठीत असे अनेक शब्द आहेत. पण असे शब्द टाळावेत. कारण हे शब्द हिंदीत रूढ नाहीत.

सगळीकडे एकाच साच्यातली, एकसुरी, यंत्रमानवी 'शुद्ध' मराठी बोलली गेली तर काय मजा नाही. प्रत्येक प्रदेशाने आपल्या भाषिक लकबी, हेल आदी गोष्ट जपायला हव्यात, असे मला वाटते. म्हणजे उदाहरणार्थ अमरावतीकराने उमरावतीचीच मराठी त्याच हेलात बोलायला हवी. असो. चूक भूल देणे घेणे.

लीना गोविलकरांच्या 'मराठी भाषेचे व्याकरण' ह्या पुस्तकातली काही वाक्ये ह्याबाबतीत विचार करण्यासारखी आहेत. ती अशी --
"व्यवहारातील शुद्धाशुद्ध आणि भाषेतील शुद्धाशुद्ध ह्या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या कल्पना आहेत. समाजाने ज्या रूपांचा स्वीकार केला आहे, ती शुद्ध आणि ज्या रूपांचा उपयोग क्वचित होतो किंवा ज्यांचा स्वीकार केलेला नाही, ती रूपे अशुद्ध होय. शुद्धाशुद्ध स्थलकालसापेक्ष असते. एका काळातले शुद्ध मानले जाणारे रूप दुसऱ्या काळात शिष्टसंमत असतीलच असे नाही."