समीक्षेबद्दल धन्यवाद!
सध्या थंडीचे दिवस अजून पूर्ण विस्मृतीत गेले नाहीत त्यामुळे थंडीचे वर्णन जास्त विस्ताराने केले आहे. उन्हाळ्याचे/ग्रीष्माचे वर्णन आत्ताच करून या दिवसांची मजा का घालवायची? योग्य वेळी तेही करूच की!
मी हिवाळ्याचे वर्णन केले याचा अर्थ "तुमचा आवडता ऋतू कोणता" या प्रश्नाचे उत्तर हिवाळाच अपेक्षित आहे असा होत नाही. या प्रश्नाचे उत्तर काहीही असू शकते. वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हा या लेखाचा उद्देश नाही. आणि उत्तर देणे बंधनकारकही नाही हे तुलाही मान्य होईल कारण तू तरी त्या प्रश्नाचे उत्तर कुठे दिले आहेस?
बाकी,
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
येती नि जाती येती नि जाती
अशी (बहुधा) शांता शेळक्यांची एक कविता आहे. ऋतूची मजा घेत दिवस घालवले की ते असे वाटतात( म्ह. कवितेत म्हटल्याप्रमाणे) असं माझं मत आहे. आणि ज्याला ऋतूची मजा घ्यायची आहे त्याला भौगोलिक तीन आणि पारंपारिक सहाही ऋतू असेच वाटणार अशी माझी धारणा आहे. म्हणून लेखाला हे शीर्षक दिले आहे.
शालेय अभ्यासक्रमातील निबंध आणि ललितलेखन यात फरक असतो आणि निबंध तपासल्याप्रमाणे ललितलेखन 'तपासल्यास' चवळीची उसळ आणि द्राक्षांचा घड एकाच मापाने मोजणाऱ्या निरिच्छ संन्याश्याला पाककौशल्याबद्दल त्याचे मत विचारल्यासारखे होईल असे प्रामाणिकपणे वाटते.
पुढील समीक्षांसाठी मनापासून शुभेच्छा....
--अदिती