गडे आम्ही नाही जा... असे काही से वाटते निमिष यांचे प्रतिसाद वाटुन. अहो विषय चांगला आहे. पण मांडलेले विचार एकांगी आहेत असे वाटल्या शिवाय राहत नाही.

वर काही मुद्दे लिहिले आहेतच. तरिही लिहितो.

कोणताही धंदा असो, मग अगदी फुगे विकायचा असो की हा आपला माहिती तंत्रज्ञाचा, धंदा नेहमीच फायद्यासाठी केला जातो. तुम्ही स्वतः कानावर आलेली कारणे लिहिली आहेत. लिहितानाचा विचार हा खास करून कर्मचाऱ्यांचा विचार करून लिहिला आहे. जर तुम्हाला कर्मचाऱ्यांची काळजी असेल तर सरळ साधा मार्ग आहे. डाव्या विचारसरणीच्या पक्षांना पकडा. असेल शक्य तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजंदारीवर (हो रोजंदारीवरच, इथे पगार भले ही महिन्याला मिळत असेल पण मुळ धंदा हा रोजंदारीवर करून तुम्हाला महिन्याचा पगार मिळतो ते कटू सत्य आहे.) काम करणाऱ्यांची संघटना करा आणि हमारी मांगे पुरी करो म्हणायला सुरू करा. अथवा पुढचा कोणता तरी २ महिन्यांचा शिकवणी वर्ग करा आणि दुसऱ्या क्षेत्रातली नोकरी शोधा.

धंदा करता बारा तेरा - ही एक म्हण आहे. धंदा म्हणला की चढ-उतार हे आलेच. जे पक्के आहेत त्यांचा निभाव लागेल जे नाहित ते प्रवाहा सोबत जातील. एक कर्मचारी म्हणून मला पुर्वतयारी करून स्वतःच्या नोकरीची काळजी घेण्याचे सर्व मार्ग अभ्यासणे हा योग्य पर्याय वाटतो. एक व्यावसायिक म्हणून माझा व्यवसाय नेहमीच फायद्यात ठेवण्यासाठी मला जर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागली तर ते योग्यच आहे. अथवा जास्त पगार घेणारे कमी करून त्यांच्या जागी कामास सुयोग्य आणि कमी पगारात काम करणारे मिळाले तर मी त्यांना घेइन. मग एक कर्मचारी म्हणून मी कमी पगार मान्य करायचा कि माझ्या गरजा भागवणारा पगार देणारी माझ्या योग्यतेची दुसरी नोकरी शोधावी हे मीच ठरवायचे आहे. त्यामुळे ही परिस्थिती भयानक, भयंकर वगैरे आहे अजिबात नाही.

आता प्रश्न उरतो तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली नोकरी म्हणजे लठ्ठ पगार हे समीकरण. याला जबाबदार कोण? कदाचित त्या क्षेत्रात काम करणारेच. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे हे बहुतांशी सेवा-पुरवणारे आहेत. ज्याचा मोबदला परकिय चलनात मिळवला जातो. भारतीय रुपया आणि इतर परकिय चलने, या मधल्या फरकामुळे हा मिळणारा मोबदला जास्त फायदा कमवून देत होता. त्यातलाच काही भाग पगार म्हणून दिला गेला. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले अनेक जण म्हणतात की तुम्हाला पैसा दिसतो, पण त्यासाठीची तडजोड दिसत नाही. हे तर पुर्णपणे अमान्य आहे. तुम्ही किती काम करावे? आणि त्याचा मोबदला काय घ्यावा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मग स्पष्टीकरण देण्याची गरजच काय? तुम्हाला १६ तास काम  (कागदोपत्री ८ तास) आणि त्याचा मोबदला २५ क्ष घ्यायचा आहे की खरोखरचे ८ तास मेहनत घेउन १५ क्ष घ्यायचा हा ही प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गरजा उत्पन्न झाल्या म्हणून लोकं तिकडे वळले हा मुद्दा खरा असला तरी सरसकट सगळेच या उदात्त विचाराने गेले आहेत का? किती जणांनि फक्त पगाराचा आकडा पाहिला? किती जणांना भारता बाहेरच्या संधींचा विचार केला? हे सुद्धा अनेक पैलू आहेत.

माजी राष्ट्रपती कलामांचे हे काही विचार जरूर वाचा.