हे असे शहर वेठीस धरण्याचे प्रकार करणाऱ्या गुंडांना आणि त्यांच्या नेत्यांना इच्छाशक्ती असल्यास कुठलेही सरकार धडा शिकवू शकते. पण ह्या सरकारकडे तशी इच्छाच नव्हती. असो. तसेच मोलमजुरी करणाऱ्या गरीब बिहाऱ्यांना, भैय्यांना त्यांच्या भेदरलेल्या कुटुंबीयांना दार तोडून घरात घुसून मारण्यात कुठलीही मर्दुमकी नाही.
हे देश तोडण्याचे असे प्रकार अतिशय निंदनीय आहेत. ह्या घटना कितीही तुरळक असल्या नसल्या तरी परिणाम दूरगामी आणि भयानक होऊ शकतात. आणि हे असे प्रकार झाल्यावर. 'भैय्ये महाराष्ट्रात खूप झाले आणि डोईजड झाले' असे वाटून भैय्याविरोधी आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणारे बुद्धिजीवी (?) लोकांचे अजूनही आश्चर्य वाटते. हिंदी वाहिन्यांनी, माध्यमांनी जी भूमिका घेतली ती सर्वांना माहीत आहेच. पण मराठी वाहिन्या आणि माध्यमेही मागे नाहीत. ह्या सर्व प्रकारांचे त्यांनी कुठे ठळकपणे, कुठेकुठे सूक्ष्मपणे समर्थनच केले आहे. काहींना विरोधी भूमिका घ्यावीशी वाटलीही असेल. पण दहशतीपायी त्यांनी ते टाळले असावे असे वाटते. असो. एकंदर हा जो प्रकार घडतो आहे तो अतिशय वीट आणणार आहे आणि उन्मादलेल्या बहुसंख्याविरुद्ध जाण्याचे धाडस कुणाचेही नाही, असे दिसते.