हे प्रकार कितीही निंद्य असले तरी नवीन अजिबात नाहीत.

मुळात या सगळ्याला राजाश्रय आहे. एका अशाच बंद वा आंदोलन जे काही होते ते सरल्यावर चक्क सरकारने 'त्या घटनेच्या चित्रफिती पाहून कुणावरही कारवाई केली जाणार नाही' असे वचन दिले होते.

प्रक्षोभक घटना वा आंदोलन दूर राहिले, साधा गल्ली पातळीचा नेता (जो कदाचित गुंड म्हणून कुप्रसिद्ध असतो) मेला तर त्याचे चमचे तो संपूर्ण परिसर बंद करायला लावतात. सरकारने कधी कारवाइ केल्याचे ऐकिवात नाही. कशी करणार ? ही सर्व कृत्ये सरकारचे घटकही बिनबोभाट करत असतातच.

बंद, दंगल वा आंदोलने वगैरे राजकिय हेतूने अपप्रवृत्तीचे लोक करतात असे घटकाभर धरून चालुया.

सत्प्रवृत्त लोक व संघटना सदहेतूने(?) कसल्याश्या कार्याच्या प्रचारार्थ धावण्याचा स्पर्धा ठेवतात त्यावेळी सुप्रसिद्ध मंडळी धावणार व बडे लोक ते बघणार म्हणून संपूर्ण शहराच्या वाहतूकीचा बट्ट्याबोळ केला जातो. नाना सण, मिरवणुका, उत्सव या निमित्त्याने सर्रास रस्ते अडवले जातात. कुणी तारे तारका / खेळाडू वा पुढारी जाणार म्हणून करदात्या नागरिकांचा रस्त्यावर चालायचा हक्क डावलला जातो. गुन्हेगारीला आळा घालायला वा तपासकार्याला पोलिस अपुरे पडत असताना राजरोसपणे पोलिसांना बंदोबस्तावर राबवले जाते.

या पैकी कोणत्या कार्यक्रमावर सरकारने बंदी आणली आहे? काय करवाई केली आहे? असा प्रस्ताव समजा चुकून कुणी पटलावर आणाचा विचार व्यक्त केला तरी त्याला किती लोकप्रतिनिधी समर्थन देतील?

थोडक्यात हुकुमशाहीत जे राजा व त्याचे मूठभर सरदार करतात ते सगळे लोकशाही राष्ट्रात असंख्य राजे व त्यांचे अनंत सरदार करतात. राजा वाईट असला तर प्राक्तनाला दोष देता येतो. आपणच निवडून दिलेल्या व आपले प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी हैदोस घातला तर तक्रार कसली? व कोण कुणाकडे करणार?

लोकशाही हा दागिना खरा पण तो उडाणटप्पू जुगाऱ्याच्या हाती पडला तर तो दागिना विकून दारू पिणार व जुगार खेळणार, त्या दागिन्याने त्याची शोभा वाढणार नाही वा तो त्या दागिन्याचा आबही राहणार नाही. आधी नागरिकांना लोकशाही राष्ट्राच्या नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांची जाण करून देणे आवश्यक आहे. ते पेलण्याइतकी वैचारिक प्रगल्भता प्राप्त झाल्यावरच लोकांच्या हाती राज्य द्यावे. न पेक्षा आई-वडील अचानक गेल्यावर मालमत्ता अजाण बालकाच्या नावे होते; त्याच्या पालनपोषणाचे अधिकार नातेवाईकाना प्राप्त होतात आणि अनेकदा ते पोर रस्त्यात टाहो फोडत राहते आणि ते तथाकथित पालक संपत्तिचा उपभोग घेतात तसे होते. प्रजा रस्त्यावर आणि प्रजेचे पालनकर्ते सर्गसुखात!