आपण आंधळे झालो आहोत.
इगतपुरीमध्ये एका बिहारी तरूणाचा हल्ल्यात मृत्यू झाला. ही बातमी आतल्या पानाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडून गेली.त्याच्या कुटूंबियांना पैसे द्यायला मंत्रीसाहेब गेले तेव्हा कळाले की कुटुंबिय त्याच्या अंत्यसंस्कारासाठी बिहारला गेले होते. इतके दुर्लक्ष झाल्यावर त्याच्या मृत्यूसाठी माफिनामा वगैरे दूरची गोष्ट झाली.
हो. आपण आंधळे झालो आहोत, कारण आपण एका देशात आहोत हे कधीच विसरून गेलो आहोत.
राजसाहेबांना विचारले की तुम्ही गांधीजींचा आदर्श देता, मग त्यांच्याप्रमाणेच सविनयकायदेभंग का स्वीकारीत नाही? त्याला त्यांचे उत्तर आहे, "सविनय कायदेभंग सुसंस्कृत आणि कायदे जाणणाऱ्या ब्रिटीशांविरूद्ध ठीक होता". ब्रिटीशांचे आपल्यावरील राज्य सुसंस्कृत??? आपला इतिहास परत लिहायला हवा असे वाटते. राज्यातील इतर गंभीर समस्यांकडे का लक्ष देत नाही? याला उत्तर आहे त्यात प्रसिद्धी कमी मिळते. यात घटनेचा भंग होतो असे वाटत नाही का याला उत्तर आहे स्वातंत्र्यवीरांनीही कायदेभंग केला होता. मुळात या प्रसंगाची तुलना गांधीजींच्या सविनय कायदेभंगाशी करणे हाच मोठा विनोद आहे.
इथे शब्द खुंटतात. ज्या कृतीमागे विचारांची दिवाळखोरी असते तिचे परिणाम याहून वेगळे होऊ शकत नाहीत. मला वाटते आत्ता जर आपल्या स्वातंत्रवीरांनी देशाची ही परिस्थिती पाहिली असती तर आपण नेमके कशासाठी लढलो असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असता.
हॅम्लेट