कोणतीही आचारसंहिता कार्यालयाच्या दारात अशा पद्धतीने लावणे मला अत्यंत अपमानास्पद वाटते. पुण्याखेरीज इतरत्र आणि मराठी माणसांखेरीज कोणा इतर जनांच्या व्यवसायात असा जाहीर अपमान करण्याची प्रथा नसावी का काय कोण जाणे... असल्यास निदान मी अनभिज्ञ आहे.
इतरत्र जेव्हा पार्टींसाठी किंवा समारंभासाठी जी व्यक्ती/ संस्था नोंदणी करते तिला नोंदणी करताना अशा पद्धतीच्या आचारसंहितेवर स्वाक्षरी करावी लागते, कारण समारंभाला, तिथे आयोजीत कार्यक्रमाला आणि आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना सदर व्यक्ती/संस्था जबाबदार असते. उद्या एखाद्याने कार्यालयाच्या भिंती रंगवून ठेवल्या तर कार्यालयाचे संचालक ज्याने त्या कार्यालयाची नोंदणी केली त्याला जबाबदार धरतात, आलेल्या प्रत्येक पाहुण्याला नाही.
अमेरिकेत तुम्ही ज्या विभागात राहता त्या विभागासाठी कम्युनिटी हॉल असतात. ते तुम्हाला समारंभासाठी वर्षांतून १-२ वेळा फुकट दिले जातात. जी व्यक्ती/संस्था हा हॉल बुक करते त्याच्याकडून डिपॉझीट घेतले जाते आणि तिला अशाप्रकारच्या आचारसंहितेवर स्वाक्षरी करावी लागते. सदर व्यक्ती/संस्था जबाबदारपणे आलेल्या पाहुण्यांना गरज पडल्यास (कारण काही अपवाद आणि मुले-बाळे सोडून बरीचशी माणसे समजूतदार असतात, त्यांना वेगळ्या सूचना द्यायची गरज पडत नाही) जबाबदारीची जाणीव करून देते. समारंभ संपल्यावर तो हॉल जसा मिळाला होता तसाच्या तसा, (म्हणजे ज्याप्रमाणे टेबले-खुर्च्या लावून ठेवली होती इथपासून शौचालयातील स्वच्छता इथपर्यंत) परत करावा लागतो. अन्यथा, तो सर्व खर्च नोंदणी करणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडून वसूल केला जातो.
इतके साधे गणित असताना आल्यागेल्याला कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज काय?