इतर भाषिक मराठी शिकून पुढे जातीलच. त्यांना क्लासची आवश्यकता नाही. 'पुढे' जाण्यासाठी ते वाट्टेल ते कष्ट करायला तयार असतात. तयार नसतो तो मराठी माणूस.

आमच्या कॉलनीतील मारवाडी दुकानदाराचे आख्खे कुटुंब स्वच्छ मराठी बोलते. त्यांची ३ आणि ४ वर्षांची मुलेही एकमेकांशी मराठीत भांडतात. 'मेल्यांनो, मारवाडीत भांडा.' असे म्हणून आई त्यांच्या पाठीत धपाटा घालत नाही. मारवाडी भाषा आता अस्तंगत होत चालली आहे अशी खंत कधी त्यांच्या बोलण्यात येत नाही. सकाळी ६.०० वाजता दुकान उघडतात आणि रात्री ११.०० वाजता बंद करतात. ३ वर्षात कॉलनीतील दुसरे दुकान आणि एक फ्लॅट त्यांनी विकत घेतला आहे.

कॉलनीतील दुसरे एक दुकान मराठी माणसाचे आहे. सकाळी ९.०० वाजता उघडते रात्री ८.३० ला बंद होते. आज एखादी चांगली वस्तू तिथे मिळाली तरी उद्या ती मिळेलच ह्याची गॅरंटी नाही. आणि उद्याच काय येत्या २ -३ आठवड्यात मिळाली तरी तुमचे नशीब. 'सेल्समन आला/येत नाही' ही ओरड कायम. मारवाड्याला हा प्रॉब्लेम येत नाही. माल संपण्याच्या आधीच तो सेल्समनला (आणि तो न आल्यास मार्केटींग मॅनेजरला) फोन करून नवीन मालाची व्यवस्था करतो. 'माल नाही' असे उत्तर सहसा मिळत नाही. आपला मराठी दुकानदार हे शिकत नाही. 

मराठी भाषांचे क्लास काढण्यापेक्षा मराठी माणसात उद्योजकता/उद्यमशीलता रुजविणे अत्यंत गरजेचे आहे. शिवसेनेने सुरू केलेले 'पुरस्कृत वडा-पाव केंद्र' आज कुठे आहेत? 'झुणका-भाकर केंद्रे' कोणाच्या ताब्यात आहेत? ह्यावर विचार करून मराठी माणसाने इतरांशी स्पर्धा करत व्यापारात मुसंडी मारली पाहिजे. मारामाऱ्या न करता अंगमेहनत, सातत्य आणि सतर्कता ह्या गुणांचा अंगीकार करून स्वतःची आणि महाराष्ट्राची भरभराट करून घेण्याची गरज आहे. प्रत्येक परप्रांतीयाकडे शिकण्यासारखा एकतरी गुण सापडेल तो आत्मसात करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे. मराठी समाज नक्कीच त्यांना साथ देईल. अन्यथा, आजच्या परिस्थितीत बदल घडणार नाही. राजकारण्यांना स्वार्थकारणासाठी असेच मुद्दे मिळत राहतील आणि मुंबई अशीच बकाल होत राहील.