'इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये जाऊन तेथील मुलांमध्ये मराठीचा जागर केला पाहिजे' हा विचार तुम्हाला पटतो का?
हो, हा विचार मला तरी पटतो. इंग्रजी माध्यमातील शाळेत जाणाऱ्या बहुसंख्य पालकांनी मराठीचा विचार जवळजवळ सोडुनच दिलेला आहे. (अर्थात अपवाद हे असणारच.) मुलांचा वाढता अभ्यास हे एक महत्त्वाचे कारण त्याला आहे. आधीच शाळेच्या अभ्यासाने दमलेल्या मुलांवर अजून घरच्या ह्या अभ्यासाचे बोजे कशाला? शिवाय मराठी आले नाही तरी फारसे काय बिघडणार आहे? इंग्रजीत तर पारंगत होताहेत ना मुले, मग बस्स झाले. शेवटी तीच भाषा कामी येणार आहे. असे विचार करणारे पालक बहुसंख्य आहेत. त्यात त्यांचा काही दोष आहे असे मला तरी वाटत नाही.
अश्या वेळी मराठीवर प्रेम करणाऱ्या लोकांनी इंग्रजी माध्यमातील शाळेत जावून मुलांना मराठी भाषेची, साहित्याची ओळख करून दिली पाहिजे. मुले त्यांचा भावतील त्या गोष्टी चटकन उचलतात. मग ती मराठीत असो वा इंग्रजीत. पण मुळात ओळख तर करून द्यायला पाहिजे.
तो व्यवहार्य आहे की नाही असे आपल्याला वाटते?
व्यवहार्य का नाही? शाळेचे सहकार्य असल्यास सहज जमू शकेल. असा उपक्रम मुंबईला कोणी सुरू केल्यास मी स्वतः त्यात भाग घ्यायला तयार आहे. शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके नुसतीच पडून असतात. आपल्या घरीही सापडतील.. जागर करायला हवा असे ज्याना वाटते त्याना जागर करायचे मार्गही सहज सापडतील.
बाकी प्रश्नांची उत्तरे कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांकडून जाणून घेण्यास उत्सुक...
साधना.