अकबराने हिंदू राजकन्येशी लग्न करण्यापेक्षाहीअधिक महत्त्वाच्या अशा इतर गोष्टी केल्या. पहिली बाब म्हणजे राज्यविस्तारासाठी युद्धे चालू ठेवली असली तरी युद्धजितांना सक्तीने मुसलमान वा गुलाम करण्यात येऊ नये. मुस्लिम धर्मशास्त्रानुसार प्रत्येक मुसलमान हा फक्त धर्मयुद्धासाठीच बिगर मुसलमानांशी लढत असतो . दोन मुसलमानांमधील भांडण हे त्यांची खाजगी बाब आहे तर बिगरमुसलमानांशी होणारी लढाई हे धर्मयुद्ध. त्यामुळे अकबराचा विजय झाला तरी धर्माचा विजय होणार नाही ही बाब तत्कालीन समाजव्यवस्थेत धक्कादायक होती. अकबराने धर्मशास्त्रात केलेला उघड हस्तक्षेप होता. दुसऱ्या एका निर्णयानुसार अकबराने मुसलमान धर्मगुरुंचे अधिकार किती हे ठरवण्याची पद्धत निश्चित केली. हा सरळसरळ खलिफाच्या अधिकारामध्ये केलेले आक्रमण होते. पुढेपुढे अकबराने हिंदू राजकन्यांशी विवाह करताना त्यांनी मुसलमान होण्याची काहीही गरज नाही असा धर्मद्रोही निर्णयही घेतला होता.

१५६३ साली अकबराने हिंदूंवर असलेला यात्रा कर रद्द केला व लगेच पुढच्या वर्षी जिझिया कर रद्द केला. मूर्तिपूजक किंवा अग्नीपूजक यांना इस्लाममध्ये परवानगी नाही. त्यांना जिझियाची परवानगी नसते. त्यांनी एक तर मुसलमान तरी व्हावे किंवा मृत्यू तरी पत्करावा असे मुसलमान धर्मशास्त्रानुसार लिहिले आहे. मुहम्मद बीन कासीमने लादलेला हा कर म्हणजे हिंदूंना दिलेली एक प्रकारची सवलत होती. उत्तरेतील मुसलमान राजे सक्तीने हा कर वसूल करत. दक्षिणेत हा कर तत्त्वतः अस्तित्वात होता. मात्र जिझिया घेऊन हिंदूंना जिवंत ठेवणे हीच मुसलमान धर्मशास्त्राविरोधात केलेली तडजोड होती. अकबराने जिझिया कर रद्द केला हा धर्मशास्त्रातील खूप मोठा हस्तक्षेप होता!

हा कर रद्द करण्यामागची अकबराची भूमिका उदारमतवादाची होती. एक म्हणजे जिझिया दिल्यानंतर हिंदूंवर हे राज्य टिकवण्याची वलढण्याची जबाबदारी राहत नाही. मात्र प्रत्यक्षात हिंदू लोक आपल्या (म्हणजे अकबराच्या) राज्यासाठी लढत होते. शिवाय जिझिया कर हा शत्रूंवर असतो. आमच्या राज्यातील बिगरमुसलमान लोक हे शत्रू वा जित लोक नाहीत अशी त्याची भूमिका होती. शिवरायांच्या औरंगजेबाविरोधातील लढाईचे एकप्रमुख कारण हे औरंगजेबाने पुन्हा सुरू केलेला जिझिया कर हे होते. शिवरायांची अकबराविषयीची भूमिका ही आदराची होती. त्यांनीअकबराला पुण्यश्लोक म्हटलेले आहे.

जिझिया कर रद्द करणे म्हणजे मुसलमान हे देशाचे जेते नसून इथलेच नागरिक आहेत व बिगरमुसलमान हे जित लोक नसून ते देखील याच देशाचे प्रजाजन आहेत अशी भूमिका घेणे आहे. हिंदू व मुसलमान हे दोघेही याच देशाचे नागरिक आहेत ही स्पष्ट भूमिका घेणाराअकबर हा पहिला मुसलमान राजा असावा!

हिंदू जागृती नामक एका संघटनेचे जोधा अकबर विरोधातील एक पत्रक पाहिले तर त्यात अकबराने ५००० हिंदू स्त्रियांना जनानखान्यात ठेवले होते व अत्याचार केले होते असे लिहिले आहे. अकबराच्या जनानखान्यात अनेक स्त्रिया होत्या. तो वैराग्यशील राजा नव्हता.स्त्रिसहवासासह इतरही काही भोगविलास तो करत असे. मात्र हे चित्र एकट्या अकबराचे नाही. त्याच्या अनेक सरदारांचेही मोठमोठे जनानखाने होते. हिंदू मंडळींचे जनानखाने थोडे लहान असत. महाराणा प्रताप यांचे वडील उदयसिंह यांच्या अनेक बायकाहोत्या. जनानखान्यामध्ये अनेक स्त्रिया होत्या. हिंदू राजाच्या अंतःपुरामध्ये पकडून आणलेल्या शत्रूंच्या स्त्रिया वा कन्या नसत हे मानणेभोळसटपणाचे आहे. मात्र बहुसंख्य हिंदू राजांची मोठमोठ्या जनानखान्यांची प्रथा नव्हती मुसलमान राजांची ती होती.

आयुष्याच्या उत्तरकाळात अकबर थोडा अधिक धर्मनिष्ठ झाला असे मानतात. मात्र अकबरपूर्व व अकबरोत्तर मुसलमान राजवटींपेक्षा अकबराची राजवट ही वेगळी होती. आपला राज्यविस्तार, राजकारण व प्रशासन याला धार्मिक रंग येऊ नये हे त्याने कटाक्षाने जपण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन कालखंडातील अकबराचा विरोधक राणाप्रताप व नंतर उदयास आलेले शिवाजी महाराज यांनीही आपले राजकारण व प्रशासन याला धार्मिक रंग येऊ नये हे पाळले. शिवाजीने आपले आरमार मुस्लिम सेनापतीच्या हातात दिले होते.

अयशस्वी असला तरी अकबराने केलेला समाजपरिवर्तनाचा प्रयोग अभ्यासणे आवश्यक आहे. काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या राजाचे अनेक गुण त्याच्यामध्ये दिसतील.

सध्या चालू असलेली आंदोलने मूर्खपणाची आहेत. अकबर अगदी खोटारडा व नालायक राजा असला असता तरी अशा प्रकारची आंदोलने होणे चुकीचे आहे!