मराठी भाषा अभ्यासक्रम मुलांना जड जातो.  माझ्याच मुलीचे उदाहरण द्यायचे तर ती नर्सरी ते पहिली इंग्लिश माध्यमातून शिकली. दुसरीपासून मी तिला मराठीला घातले.  पाचवीपासून गणित विज्ञान इंग्लिश मधून सुरू झाले.  बाकीचे विषय मराठीतुनच आहेत.  आता सातवीला स्कॉलरशिप परीक्षा मात्र इंग्लिशमधून देण्याचा तिने निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात तिची परीक्षा झाली.  तिच्या मते मराठी व्याकरण कळायला खुप कठिण जाते. समास, संधी वगैरे अगदी डोक्यावरून जातात.    तिला मराठीची खुप आवड आहे.  अभ्यासाव्यतिरीक्त अन्य मराठी वाचनही भरपुर आहे.  मराठी माध्यमातून शिकल्यामुळे अभ्यास समजायला सोपा जातो असे ती म्हणते, पण तरीही मराठी हा विषय म्हणून अभ्यासक्रमात नको आहे. उद्या १० वीला जर तिला मराठीला पर्याय मिळाला तर ती तो पर्याय निवडेल मराठीला डावलून.

मराठीचा जागर करा असे म्हणणाऱ्यांना बहुतेक इंग्लिशमधून शिकणाऱ्या मुलांनी मराठी माध्यम घ्यावे असे म्हणायचे नाहिय तर त्यानी मराठी वाचन करावे, मराठी बोलावे,  ह्या भाषेचे सौंदर्य जाणावे,  हॅरी पॉटर वर लट्टू होणाऱ्यांना मराठीतही तितकेच चांगले साहित्य आहे हे कळावे,  आजच्या मुलांनी मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत न्यावी असे अभिप्रेत आहे असे मला वाटते.  खरे काय आहे ते कार्यक्रमाला हजर असणारेच सांगू शकतील.