मुळात, मराठी पालकांचे मराठी भाषेवर 'प्रेम' असणे गरजेचे आहे. पालकांचे मराठी भाषेवर प्रेम असेल तर त्यांनी हेच प्रेम आपल्या पाल्याच्या मनात निर्माण होईल असे प्रयत्न केले पाहिजेत.
माझी भाची इंग्लिश माध्यमातून शिकली आहे पण तिच्या आई-वडिलांना मराठी भाषे बद्दल अभिमान आणि भाषेवर निरातिशय प्रेम आहे. त्यांनी हे भाषाप्रेम यशस्वीपणे आपल्या मुलीच्या मनात रुजविले आणि तिने मराठी मनःपूर्वक आत्मसात केले आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपेक्षाही तिचे मराठी उच्च प्रतिचे आहे.

माझा मुलगाही दहावी पर्यंत परदेशात इंग्लिश माध्यमात शिकला पण घरात मराठी भाषेचेच बाळकडू त्याला मिळाले. ११वीला पुण्यात आल्यानंतर मराठी वातावरणाशी जुळवून घेण्यास त्याला काहीच त्रास पडला नाही. तो मराठी वाचन करीत नसला तरी इंग्रजीचा आधार न घेता उत्तम मराठी बोलू शकातो.

सांगण्याचा उद्देश हाच कि घरातील वातावरण अस्सल मराठी असावे. भाषेवर प्रेम असावे. घरात मराठी भाषेवर उद्भोदक चर्चा व्हावी. मराठी भाषेचे सौंदर्य मुलांना उकलून दाखवावे. रसग्रहण करण्यास शिकवावे. मराठी कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यास 'तयार'करावे. आपल्या घरी येणाऱ्या मित्र परिवाराबरोबर आवर्जून मराठी बोलावे. मराठी भाषेत बोलण्यासाठी मुलांना उद्युक्त करावे. पार्ट्यांमधून त्यांच्याशी मुद्दाम मराठीत बोलावे त्यांना चर्चेत सहभागी करून घ्यावे. 

इंग्रजी ही आवश्यक भाषा आहे तर मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी ही आपली संस्कृती आहे.