संग्राहक
हा विषय येथे मांडल्याबद्दल आपले आभार. एकुणात परिसंवाद चांगला झाला. म. सा. प च्या युवा विभागाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनासाठी खूप कष्ट घेतलेले दिसत होते. रामदास फुटाणे हे खरंतर परिसंवादात सहभागी नव्हते, ते परिसंवादा आधी झालेल्या बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. त्या प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणातला काही भाग या बातमीत दिलेला दिसत आहे. परिसंवादात आम्ही जे पाच वक्ते बोललो त्यातल्याही फक्त माझ्या (एकूण पंधरा मिनीटांच्या भाषणातल्या) दोन ओळी इथे दिलेल्या दिसत आहेत. थोडक्यात एकूणात दोन अडीच तासांच्या कार्यक्रमातल्या चर्चेमधली पाच सहा वाक्य त्या वाक्यांच्या आधीचे आणि नंतरचे संदर्भ न देता या बातमीत दिलेली दिसतात. बातमीत जे छापलेलं दिसत आहे त्यावर चर्चा करताना हा सर्व context आपण लक्षात घ्यावा ही विनंती.
माझ्या आठवणीनुसार 'जागर' हा शब्द फुटाणे यांचा नसून तो बातमीदाराचा आहे! फुटाणे यांनी अगदी साधी कल्पना मांडली. त्यांची कल्पना अशी आहे : पाठ्यपुस्तकामध्ये ज्या लेखकांचे धडे असतात त्यांना वर्षामधून एकदा (मराठी दिनाच्या निमित्तानी) शांळांमध्ये निमंत्रित करायचं आणि त्यांचा विद्यार्थ्यांची संवाद आयोजित करायचा. जस्तित जास्त मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकत असल्यानं हा उपक्रम प्रामुख्याने इंग्रजी शाळांमध्ये आयोजित करायचा. हा उपक्रम म. सा. प ने घडवून आणल्यास जागतिक मराठी अकादमी (ज्याचे श्री फुटाणे अध्यक्ष आहेत) आर्थिक हातभारही देण्यास तयार आहे.
मला असं वाटतं की त्या बातमीवर चर्चा करण्याऐवजी या कल्पनेवर चर्चा करावी. या सारख्या इतर कल्पना आपल्याला सुचत असतील तर त्या सुचवाव्यात. त्या कल्पनांसाठी / कल्पनांमध्ये आपण स्वतः काय योगदान देऊ शकू हेही सांगावं (म्हणजे फक्त दुसऱ्या कोणी काय करावं असं नाही तर, आपण स्वतः काय देऊ शकू उदा. पैसा, वेळ इ.)
आपल्या कल्पना आपण नक्कीच म सा प आणि जा म आ पर्यंत पोचवू शकू.
आता परदेशात अनेक मंडळी कार्यरत आहेत या माझ्या विधाना विषयीः
मी अगदी थोडक्यात परदेशांमधली महाराष्ट्र मंडळं काय आणि कसं काम करतात हे सांगितलं. या मध्ये महाराष्ट्र मंडळ लंडन, मित्र यु के, बी एम एम, युरोपिय मराठी संमेलन ही लोकं काय करतात हे अगदी थोडक्यात सांगितलं. याच बरोबर इंटरनेटवर काय घडत आहे, आणि त्यात विशेषतः मायबोली आणि मनोगत या वेबसाईटस मराठीसाठी काय काम करत आहेत हेही सांगितलं. (आणि बऱ्याचदा छापील साहित्यापेक्षा दर्जेदार साहित्य या संकेतस्थळांवर दिसतं असंही सांगितलं.... जे मला अनेक वर्षांपासून एखाद्या साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर सांगायची इच्छा होती!).
बाकी तो - 'महाराष्ट्रातील मराठी कशी वाचवायची यावर चर्चा परदेशात होईल' हा अतिशयोक्ती अलंकारातला विनोद होता... (आणि वार्ताहरानी विनोद समजून न घेता मी शंका व्यक्त केली असं लिहिलं... असो!)