वहातुकीच्या नियमात randomness  आहे हे कबूल, पण तो भाषेतील नियमांइतक्या मोठ्या प्रमाणात नाही. लाल/हिरवा/केशरी रंग वापरण्यामागे किंवा डावीउजवीकडून जाण्यामागे काही कारणे आहेत, त्यांचा ऊहापोह नंतर कधीतरी.

पण हे नियम असले, तरी डाव्या बाजूपासून नेमके किती इंचाचे अंतर सोडून चालावे, किंवा लाल/हिरव्या/केशरी रंगाची छटा नेमकी कुठली असावी याबाबत काही ठाम उल्लेख कोठे आहे का ? समजा लाल रंगाची कमीअधिक फिकी छटा वापरली, तर (तो लाल रंगच आहे असे नक्की कळत असताना) काही बिघडेल का ?

प्रमाणीकरण करताना ते कितपत काटेकोर असायला पाहिजे हे देखील सकारण ठरवले पाहिजे. थोड्या फार फरकानेही मूळ उद्देश साध्य होत असेल तर इतके 'puritan' असायची गरज आहे का ?

भाषेचा विचित्र अनियमितपणा जर खपवून घेतला जातो, तर मग 'ण' चा 'न' झालेले का चालू नये ? महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये या प्रकारची मराठी शतकानुशतके बोलली जाते. बरे, यामुळे काही बिघडते असे नव्हे, कारण याप्रकारचे फरक इतके सूक्ष्म आहेत कि त्यांचा अर्थ समजून घेण्यात काहीही अडचण येत नाही. मग या प्रकारचे शब्द हे 'समानार्थी' म्हणून मराठीत का सामावून घेऊ नयेत ? पाण्याला इतके समानार्थी शब्द आहेत, त्यात 'पानी' हा अजून एक घालणे अशक्य आहे का ?

फक्त पुण्यातीलच लोक मराठी बोलत नाहीत, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, गोवा, कोकण इत्यादी अनेक प्रदेशातील लोकही मराठीच बोलतात. मग आपला भाषाशुद्धीचा अट्टाहास किंचित सैल करायला काय हरकत आहे ? आणि यामुळे मराठी समृद्धच होणार नाही का ?

आता, 'अंगात शर्ट घालणे, आणि नारायन' याबद्दल. 'अंगात शर्ट घालणे' हा प्रयोग अर्थाच्या दृष्टीने 'नारायन' या अशुद्ध रुपापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात चुकीचा आहे, कारण त्या प्रयोगाचा शाब्दीक अर्थ त्याच्या खर्‍या अर्थाच्या संपूर्ण विरुद्ध क्रिया सुचवतो. मग जर असा शब्दप्रयोग आनंदाने खपवून घेतला जातो, तर 'नारायन' हा त्याच्या तुलनेत कितीतरी कमी प्रमाणात चूक असलेला शब्द का नाही खपवून घेतला जात ? ही तुलना करण्याकरताच या दोघांना एकत्र आणले होते.